Premium

कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण; गणेशोत्सव आला तरी रस्ते खड्ड्यातच

गणेशोत्सव तोंडावर आला तरी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे, खराब रस्ते सुस्थितीत करण्याची कामे पालिकेकडून सुरू करण्यात येत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

thane pathole
(डोंबिवलीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुर्दशा.)

कल्याण- गणेशोत्सव तोंडावर आला तरी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे, खराब रस्ते सुस्थितीत करण्याची कामे पालिकेकडून सुरू करण्यात येत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असताना पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधी गुपचिळी धरुन बसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिका हद्दीतील सर्व डांबरी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. कल्याणमध्ये आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे ज्या रस्त्यावरुन दररोज येजा करतात त्या कल्याण मधील संतोषी माता रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रविवारपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपले गणपती मखरात आणण्यास सुरूवात केली आहे. मागील वर्षी डोंबिवलीतील गणेश मंदिराजवळ बैठ्या हातगाडीवरुन पाच ते सहा फुटाचा गणपती नेताना खड्ड्यामध्ये हातडगाडीचे चाक अडकून हातगाडी कलंडून मोठा अनर्थ घडला होता. धार्मिक भावनांचा विचार करुन पालिका प्रशासनाने तातडीने खड्डे बुजविण्याची कामे सुरू करण्याची मागणी गणेश भक्तांकडून केली जात आहे.मागील आठवड्यात आयुक्त डाॅ. दांगडे यांनी गणेशोत्सवापूर्वी कल्याण, डोंबिवलीतील सर्व रस्ते सुस्थितीत केले जातील असे जाहीर केले आहे. आता शहरांतील रस्त्यांची दुर्दशा पाहून ही कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे रस्ते बांधकाम क्षेत्रातील जाणकार सांगतात.

हेही वाचा >>>दोन्ही डॉक्टर लोकांची नस ओळखण्यात अपयशी, आमदार प्रमोद पाटील यांची पालिका आयुक्त, खासदारांवर टीका

रस्ते कामाची जबाबदारी असलेले अभियंते रस्त्यावर फिरकत नाहीत. ठेकेदारांवर कोणाचाही अंकुश राहिला नसल्याने ते मनमानीने कामे करत असल्याच्या तक्रारी आहेत. कल्याण पूर्वेत मलंगगड रस्त्यावर एका तरुणाचा दुचाकीवरुन जात असताना मागील काही महिन्यापूर्वी दुचाकी खड्ड्यात आपटून मृत्यू झाला होता. या प्रकरणात खड्डे विषयांवरुन न्यायालयाने कल्याण डोंबिवलीसह मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील पालिका आयुक्तांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देऊन त्यांना समज दिली आहे.

मागील वर्षी पाऊस कमी होताच गणेशोत्सवापूर्वी रात्रंदिवस काम करुन डोंबिवलीच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत केले होते. लोकरे यांनी २७ गावातील रस्ते सुस्थितीत करण्याची कामे हाती घेतली होती. ग्रामीण भाग मनसेचे आ. प्रमोद पाटील यांचा मतदारसंघ आहे. तेथे लोकरे यांनी काम सुरू करुन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी तक्रार काही स्थानिक राजकीय मंडळींनी ठाण्याच्या वरिष्ठ नेत्याकडे केली. या नेत्याने आणि पालिकेली काही अस्वस्थ अभियंत्यांनी लोकरे यांची आडबाजुच्या जागेवर पदस्थापना होईल यादृष्टीने विशेष काळजी घेतली. त्याचा फटका आता शहराला बकाल रस्त्यांमधून बसत आहे, असे काही जागरुक नागरिक सांगतात.ठेकेदारांचे डांबर प्रकल्प बंद आहेत. पाऊस सुरू आहे. अशी कारणे देऊन ठेकेदार रस्ते सुस्थितीत करण्याची कामे गतिमानतेने करत नसल्याच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा >>>Maratha Reservation : ठाण्यात कडकडीत बंद; दुकानदारांचा पाठिंबा, वाहतुकीची स्थिती काय?

डोंबिवलीतील खराब रस्ते

टिळक चौक ते फडके चौक, पेंडसेनगर ते ठाकुर्ली रस्ता, ठाकुर्ली-हनुमान मंदिर रस्ता, ठाकुर्ली पोहच रस्ता, मानपाडा रस्ता, नांदिवली रस्ता, एमआयडीसीतील डांबरी रस्ते, कोळसेवाडी, काटेमानिवली, मोहने, आंबिवली, मांडा-टिटवाळा, २७ गाव भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Due to the non repair of the potholes on the roads in kalyan dombivli municipal corporation there is a lot of dissatisfaction among the passengers amy

First published on: 11-09-2023 at 14:41 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा