लोकसत्ता वार्ताहर

शहापूर : ठाणे जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे होते तसेच पंचायत समिती, नगरपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती या शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघावर आमचाच अधिकार असून शिवसेनेचा ( शिंदे गट ) बालेकिल्ला असल्याने हा मतदार संघ शिवसेनेलाच द्यावा अन्यथा आम्ही आगामी निवडणुकीमध्ये भाजपा उमेदवाराचे काम करणार नसल्याचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी पत्रकार परिषदेत सांगत आम्ही वरून आलेल्या आदेशाचे पालन करणार असल्याचे सूतोवाच केले. त्यास भाजपचे उमेदवार कपील पाटील यांनीही प्रतिउत्तर दिले आहे.

आम्हाला केवळ निवडणुकीला गृहीत धरले जाते निवडणुका झाल्या की आम्हाला बाजूला सारले जाते. मागील विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपाने शिवसेनेचा उमेदवार पाडल्याचा आरोपाबरोबरच शिवसेना संपवण्याचे काम भाजपाने गेली दहा वर्ष केल्याचा आरोप धिर्डे यांनी केला आहे. आम्ही युती धर्म पाळतो परंतु भाजपा पाळत नाही. ही युती अखेर पर्यंत राहील याची पुनरुच्चार त्यांनी केला.

आणखी वाचा-कल्याण लोकसभेत व्यक्तिगत कारणांसाठी महायुतीचे वातावरण खराब करू नका, आमदार गायकवाड समर्थकांना खासदार शिंदेंचे आवाहन

जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे होते. पंचायत समिती, नगरपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती या शिवसेनेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच अधिकार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आम्ही या जागेवर आग्रही आहोत. ही जागा यापुढे धोक्यात असल्याने आम्हाला येथे प्रतिनिधित्व देण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून ती पूर्ण होईल अशी आशा ही पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.

महायुतीच्या जागा वाटपामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ मागील दोन वर्षाच्या पंचवार्षिक प्रमाणे याही वर्षी भाजपाच्या ताब्यात गेल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याने पदाधिकाऱ्यांनी आज शहापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. भिवंडी मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व ,कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या मतदारसंघांचा समावेश होतो. आगरी कुणबी, आदिवासी, मुस्लिम अशा मतदारांचा भरणा असलेल्या मतदार संघात २००९ मध्ये काँग्रेसचा तर, २०१४ व २०१९ मध्ये भाजपाचे कपिल पाटील निवडून आले होते .यावेळी त्यांना तिकीट जाहीर झाल्याने शिवसेनेत नाराजी असल्याने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

आणखी वाचा-मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप

धिर्डे यांनी म्हटले की, महायुतीत असलो तरी, भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या निष्क्रियतेला आमचा विरोध असून भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीत उमेदवार देणार आहे. पाटील यांनी मागील १० वर्षात मतदारसंघाच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा केला जात असला तरी तो निधी विकासकामांमध्ये दृश्यस्वरुपात पहायला मिळत नाही, असाही आरोप धिर्डे यांनी केला आहे.

यावेळी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष मारुती धिर्डे, कल्याणचे तालुकाप्रमुख वसंत लोणे, शहापूर तालुका अध्यक्ष प्रकाश वेखंडे, ठाणे जिल्हा सचिव ग्रामीण कांतीलाल कुंदे, सुदाम पाटील, गायत्री भांगरे, अरुण कासार, कामिनी सावंत, सचिन तावडे, अश्विनी अधिकारी, आकाश सावंत, रेखा इसमे, पद्माकर वेखंडे, भरत बागराव आदी मान्यवर उपस्थित होते.

कपील पाटील यांचे प्रतिउत्तर

महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित बसून माझी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना वाटत असेल निवडणुक लढायची तर त्यात चुकीचे काही नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाकडे तशी मागणी करावी. कालपर्यंत ते प्रचार करीत होते. नाराजी असती तर संवाद मेळावा झाला नसता. त्यांची नाराजी दूर करण्यात येईल, असे भाजप उमेदवार कपील पाटिल यांनी सांगितले.