वाचन संस्कृती जपणे, ग्रंथांचा प्रसार व प्रचार करणे हा उद्देश ठेवून अनेक खाजगी, सार्वजनिक ग्रंथालये स्थापन होत असतात. मात्र शारीरिकदृष्टय़ा अपंग असूनही स्वावलंबी होण्यासाठी, आर्थिकदृष्टय़ा स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्थापन केलेले ग्रंथालय हे ग्रंथालय चळवळीत नक्कीच एक आदर्श ठरते. ठाण्यातील गावदेवी परिसरातील बेडेकर रुग्णालयाच्या शेजारी असणारे मनोरंजन ग्रंथालय हे असेच एक दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर साकारलेले शारदेचे मंदिर आहे. जन्मत:च अपंग असलेल्या शैला बेडेकर यांनी १९७२ मध्ये मनोरंजन ग्रंथालयाची स्थापना केली. शारीरिक अपंगत्वामुळे शैलाताईंना ग्रंथालयाचा कारभार जमेल की नाही याबाबत सुरुवातीला शैला बेडेकर यांचे कुटुंब साशंक होते. मात्र शैलाताईंना मात्र स्वत:बद्दल विश्वास होता. त्यांची जिद्द पाहून १९७० मध्ये त्यांना दिवाळी अंकापासून ग्रंथालय सुरूकरण्याची परवानगी कुटुंबीयांनी दिली. दिवाळी अंकांचे २५ ते ३० अंक घेऊन त्या बेडेकर रुग्णालयाच्या पायऱ्यांवर बसून वाचकांना मनोरंजनासाठी दिवाळी अंक उपलब्ध करून देत. पुढे १९७२ पासून खऱ्या अर्थाने दिवाळी अंक आणि पुस्तकांचा हा खजिना मनोरंजन ग्रंथालयाच्या माध्यमातून ठाणेकरांसाठी खुला झाला.
सुरुवातीला बाबांनी दिलेल्या तीन हजार रुपयांत शैलाताईंनी ग्रंथालयातील पहिली पन्नास पुस्तके खरेदी केली. मनोरंजनचा स्टॅम्प तयार करणे, पुस्तकांना कव्हर घालणे, अंकांची ऑर्डर देणे या सर्व कामांसाठी सहकाऱ्यांनी केलेली मदत ग्रंथालयाचा विस्तार करण्यासाठी त्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरली. सुरुवातीला एक रुपया वर्गणी असलेल्या या ग्रंथालयात पहिल्याच वर्षीच्या मे महिन्यात शंभर लहान मुलांनी सभासद नोंदणी केली. सध्या या ग्रंथालयात २० हजारहून अधिक पुस्तकांचा संग्रह असून संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत ग्रंथालय वाचकांसाठी खुले असते. मनाचे जे रंजन करते ते म्हणजे मनोरंजन असे म्हणतात, परंतु असे असले तरी मनोरंजन ग्रंथालयात मनोरंजन देणाऱ्या कथा कादंबऱ्यांसोबतच जाणिवा समृद्ध करणारेवैचारिक ग्रंथ, आत्म्यापासून परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारे आध्यात्मिक ग्रंथ, इतिहासाचे पुरावे देणारे ऐतिहासिक ग्रंथ अशी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके उपलब्ध आहेत. समग्र तुकाराम अभंग गाथा, महाभारताचे सर्व खंड, विज्ञानकथा, युद्ध कथा, दुर्मीळ चरित्रे विपुल प्रमाणात येथे उपलब्ध आहेत.
ग्रंथालयात नाटक विभागासाठी स्वतंत्र विभाग असून इतर विभागातील पुस्तकेही लेखकांच्या नावानुसार रकान्यात नीटनेटकी ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात. शैलाताई स्वत: हे काम करू शकत नसल्या तरी पुस्तकांच्या देखभालीसाठी त्या नेहमी आग्रही असतात. सहकाऱ्यांकडून त्या ती कामे करून घेतात. बच्चे कंपनीसाठी येथे पुस्तकांचा खास विभाग आहे. मुलांना निर्भेळ आनंद देणाऱ्या, त्यांना वाचनाची सवय लावणाऱ्या तसेच नकळतपणे त्यांच्यावर चांगले संस्कार करणाऱ्या पुस्तकांचा या विभागात समावेश आहे.
याशिवाय दर महिन्याला ग्रंथालयाकडून नव्या पुस्तकांची खरेदी केली जाते. वाचकांच्या आवडीनुसार पुस्तके ग्रंथालयात मागवली जातात. परंतु अनेकदा काही वाचक पुस्तकांची पाने फाडतात. पुस्तक वेळेत परत देत नाहीत. तरीही ग्रंथालयाकडून कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जात नाही, परंतु वाचकांनी याची दखल घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुस्तकांची खरेदी करताना शैलाताई किमतीचा विचार करत नाहीत, दर्जेदार साहित्य लोकांना वाचायला मिळावे यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. वेगवेगळ्या पुस्तकांच्या संग्रहामुळे अनेक पर्याय वाचकांना उपलब्ध असतात.
या पुस्तकांच्या वैविध्यतेमुळे प्राध्यापक, विशिष्ट विषयावर संशोधन करणारी संशोधक मंडळी इथल्या ग्रंथसंपदेने समाधानी असतात, असे ग्रंथालयाच्या वाचक विजया टिळक यांनी सांगितले.आपल्या पश्चात हे ग्रंथालय असेच राहावे किंवा तसे शक्य नसल्यास एखाद्या अपंग व्यक्तीला किंवा संस्थेला इथली पुस्तके माफक किमतीत द्यावीत अशी शैला बेडेकर यांची इच्छा आहे.
मनोरंजन ग्रंथालय : बेडेकर रुग्णालयाशेजारी, गावदेवी रोड, नौपाडा, ठाणे (प.)
किन्नरी जाधव