अंबरनाथ : फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असलेल्या वालधुनी नदी स्वच्छता मोहिमेमुळे शहराच्या प्रवेशापर्यंत वालधुनी नदीचे रूप पालटले आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नदीकिनारी वृक्षारोपण करण्यात आले. मात्र वालधुनी नदीच्या किनारी असलेल्या संरक्षित वन जागेत सुमारे ५० हजार झाडे लावली जाणार असून येथे मानवनिर्मित जंगल उभारण्याची तयारी अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी वनविभागाकडे परवानगी मागण्यात आली असून लवकरच हे काम सुरू होईल.

वालधुनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ नगरपालिका, विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. १४ फेब्रुवारीपासून अंबरनाथ नगरपालिकेच्या पुढाकाराने या मोहिमेला सुरुवात करण्यात आली, तर जागतिक पर्यावरण दिनापर्यंत ही मोहीम चालली. या मोहिमेत उगमापासून ते अंबरनाथ शहरापर्यंत विविध भाग करत नदीची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे ज्या भागात मानवी हस्तक्षेप, प्रदूषणकारी नाले आणि सांडपाणी नदीत मर्यादित स्वरूपात मिसळतात. तो भाग स्वच्छ झाला. नदीचा प्रवाह वाहता झाला आहे. त्यामुळे नदीच्या या भागाचे रूप पालटले आहे.

शहरी भागात अजून नदीच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या मोहिमेच्या निमित्ताने नुकतेच अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डम्ॉ. प्रशांत रसाळ यांच्या उपस्थितीत नदीकिनारी वृक्षारोपण करण्यात आले. या निमित्ताने वालधुनी नदीच्या किनारी मानवनिर्मिती जंगल उभारण्याची घोषणा प्रशासक आणि मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी केली आहे. अंबरनाथ शहरात पोहोचण्यापूर्वी नदीचे रूप बदलले आहे. या नदीच्या किनारी असलेल्या संरक्षित वनाच्या जागेत सुमारे ५० हजार झाडे लावली जातील, अशी माहिती डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. त्यासाठी स्थानिक वनविभागाच्या आणि वरिष्ठ कार्यालयाला पत्र देण्यात आले आहे. याची परवानगी मिळताच येथे वृक्षारोपण केले जाईल, अशी माहिती डॉ. रसाळ यांनी दिली आहे. मांगरूळच्या डोंगरावर मानवनिर्मित जंगलाची संकल्पना यशस्वीरीत्या पूर्ण होत असल्याने त्याच धर्तीवर हे मानवनिर्मित जंगल उभे केले जाणार आहे. त्यामुळे नदीच्या काठांवरची धूप रोखण्यात मदत होईल, अशी आशा डॉ. रसाळ यांनी व्यक्त केली आहे.

मोहीम पूर्ण पण प्रदूषण जैसे थे

 वालधुनी नदीच्या स्वच्छता मोहिमेला सर्वच स्तरांतून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे काटई कर्जत रस्त्यावरील पुलापर्यंत नदीचे पात्र स्वच्छ दिसू लागले आहे. मात्र या नदीत मिसळणारे शहराचे सांडपाणी, कंपन्यांचे सांडपाणी यांच्यावर गेल्या तीन महिन्यांतही प्रतिबंध करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे मोहीम पूर्ण झाली असली तरी प्रदूषण रोखण्याचा मुद्दा मात्र अनुत्तरीत आहे.