ठाणे – महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने गेल्या काही वर्षांत अनेक महत्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. परंतु या रस्त्यांवर आता दुतर्फा दुहेरी वाहने उभी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे रस्ते रुंदीकरणानंतरही येथे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. रुंद रस्ते पार्किंगसाठी आंदण दिले आहेत का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. शहरात मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. वाढत्या नागरिककरणाबरोबरच शहरात वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्या तुलनेत मात्र रस्ते अपुरे पडू लागले होते. अनेक रस्ते अरुंद होते. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली होती. ही समस्या सोडविण्यासाठी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ते रुंदीकरण मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत लोकमान्यनगर हत्तीपुल ते शास्त्रीनगर, पोखरण क्रमांक १ आणि दोन, नितीन कंपनी ते इंदिरानगर नाका तसेच घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते, कळवा आणि मुंब्रा या भागांतील रस्ते रुंद करण्यात आले. रुंदीकरणाच्या कामात बाधित होणारी बांधकामे हटविण्यात आली होती. रुंदीकरणानंतर रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे करण्यात आली. या कामानंतर रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. रुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल, असे दावे केले जात होते. परंतु बेकायदा वाहन पार्किंगमुळे पालिकेचे दावे फोल ठरू लागले आहेत.

हेही वाचा – नवरात्रोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करा; आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांची अभियंत्यांना तंबी

वागळे इस्टेट भागातील कामगार नाका, इंदिरा नगर, साठेनगर त्यासह शास्त्रीनगर, वर्तकनगर, कॅडबरी जंक्शन अशा शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. हे रस्ते वाहतुकीसाठी रुंद झाले असले तरी याठिकाणी वाहने उभी केली जात आहेत. त्यातच फेरिवाले रस्त्यावर ठाण मांडून बसत आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. लोकमान्यनगर हत्तीपूल ते शास्त्रीनगर या भागातील रुंद रस्त्यांवर दोन्ही बाजूला दुहेरी वाहने उभी केली जात आहेत. रिक्षा, टेम्पो आणि इतर वाहनांचा त्यात समावेश आहे. यामुळे वाहतुकीसाठी जेमतेम एकच मार्गिका उपलब्ध होत आहे. असेच काहीसे चित्र वागळे इस्टेट येथील रस्ता क्रमांक २२ वर दिसून येते. सिंघानिया शाळेच्या परिसरातील रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी केली जात आहेत. एकूण रस्ते रुंदीकरणानंतरही येथे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

हेही वाचा – टेंभीनाका येथील नवरात्रौत्सवासाठी वाहतुक बदल

ठाणे शहरातील रस्त्यांवर बेकायदेशीररीत्या वाहने उभी करणाऱ्यांवर वारंवार कारवाई करण्यात येत आहे. जे रस्ते रुंद करण्यात आले आहेत, त्या रस्त्यांवर पार्किंग स्लॉट देण्यात आले आहेत. स्लॉट व्यतिरिक्त इतर ठिकाणी पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. तसेच सिंघानिया शाळा सुटण्याच्या वेळेत त्याठिकाणी उभ्या राहणाऱ्या पालकांच्या गाड्यांवरही कारवाई करण्यात येते. – डॉ. विनय कुमार राठोड, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even after road widening in thane traffic jam persist ssb