ठाणे : कर्करोग संदर्भातील माहिती कर्क रुग्णांना एका ठिकाणी उपलब्ध व्हावी त्यासह, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाच्या मनात विश्वास, उमेद निर्माण होण्यासाठी ठाणे जिल्ह्यात प्रथमच कर्करोग माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. ठाण्यातील तीनहात नाका येथे हे केंद्र सुरु असून शहरातील आधाररेखा प्रतिष्ठानच्या माध्यमातून याठिकाणी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोफत मार्गदर्शन केले जाते. ठाणे शहरातील आधाररेखा प्रतिष्ठान गेले ११ वर्षे कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन, तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यात राहणाऱ्या रश्मी जोशी याचे पती अरविंद जोशी हे कर्करोगग्रस्त होते. त्यामुळे कर्करुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या अडचणी, वेदना त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. हा त्रास इतर रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना होऊ नये यासाठी या पती-पत्नीने मे २०१३ मध्ये ‘आधाररेखा प्रतिष्ठान’ची स्थापना केली. कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी विविध योजना आखून विनामूल्य सहकार्य करण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार, संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला आरोग्याविषयीची माहिती देण्यासाठी मोफत आरोग्यजत्रा उपक्रम, वैद्यकीय, आहारशास्त्र, मानसशास्त्र आणि योगाभ्यास या विषयावर तज्ज्ञ वक्त्यांची ‘आधार माला’ या नावाने संवाद मालिका राबविण्यात आली. हे समाजकार्य करत असताना २०१७ मध्ये अरविंद जोशी याचे निधन झाले, परंतु, अरविंद यांच्या पत्नी रश्मी यांनी हे समाजकार्य पुढे कायमस्वरुपी सुरु ठेवले.

आणखी वाचा-इन्स्टाग्रामवर चिडविल्याच्या वादातून कल्याणमध्ये तरूणाला बेदम मारहाण

रश्मी यांच्यासोबत २० ते २५ स्वयंसेवक या कार्यात जोडले आहेत. त्यांच्या या कार्याला रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. ठाणे शहरासह मुंबई उपनगरातूनही त्यांना मार्गदर्शनासाठी संपर्क साधला जात. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे समोरा समोर बसून समुपदेशन आणि मार्गदर्शन करता यावे, विविध उपक्रम राबविता यावेत यासाठी कर्करोग माहिती केंद्र उभारण्यासाठी हक्काची जागा मिळावी याकरता त्यांचे प्रयत्न सुरु होते. अखेर इनरव्हील चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना २६ जानेवारी रोजी तीन हात नाका येथे जागा उपलब्ध झाली. याठिकाणी जिल्ह्यातील पहिले कर्करोग माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र मंगळवार आणि गुरुवार सुरु असते. याठिकाणी कर्करोगाच्या विविध चाचण्याबाबत रुग्णांना मार्गदर्शन केले जाते. तसेच कर्करोग असल्याचे समजल्यास रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाना नैराश्य येते, त्यांना या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशनाचे दालनही या केंद्रात आहे, अशी माहिती संस्थेमार्फत देण्यात आली.

आणखी वाचा-“राज ठाकरे ज्या उमेदवाराच्या प्रचाराला जातात…”; प्रचारसभांवरून वैभव नाईकांची खोचक टीका!

कर्करुग्णांना उपचारासाठी परळ येथील टाटा रुग्णालयात वारंवार जावे लागते. यासाठी त्यांना प्रवासखर्च जास्त होत. रुग्णांचा हा खर्च वाचविण्यासाठी या संस्थेमार्फत ‘आधारवाहिनी’ उपक्रम सुरु आहे. ‘आधारवाहिनी’ ही विनामूल्य टॅक्सी सेवा असून ठाणे ते परळ येथील टाटा रुग्णालय अशी सेवा रुग्णांना दिली जाते. या टॅक्सी सेवेचा दर महिन्याला ३५ ते ४० रुग्ण लाभ घेतात. जानेवारी २०२१ पासून ही सेवा सुरु झाली आहे. या टॅक्सी सेवेच्या आतापर्यंत १२०० हून अधिक फेऱ्या झाल्या आहेत.

कर्करोगाचे निदान लवकर व्हावे यासाठी संस्थेमार्फत कर्करोग निदान शिबिर वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यासह, कर्करोगाशी संबंधित असलेल्या पुस्तकांचे डिजीटलायझेशन लवकरात लवकर केले जाणार आहे. जेणेकरुन रुग्णांना हे पुस्तक तात्काळ मिळतील. -रश्मी जोशी, सचिव, आधाररेखा प्रतिष्ठान, ठाणे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First cancer information center in thane district free guidance to patients mrj
Show comments