ठाणे महापालिकेने शहरातील पाच ठिकाणी डायलिसिस केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या केंद्रांसाठी सुमारे ५० डायलिसिस यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच डायलिसिसकरिता आवश्यक असणारा ‘आरओ प्लॅन्ट’ची उभारणीचे कामही या पाचही केंद्रांवर करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, डायलिसिस उपचार घेत असताना एखाद्या रुग्णाच्या हृदयावर गंभीर परिणाम दिसून आल्यास वैद्यकीय उपकरणांच्या मदतीने ते पुन्हा सुरू करता येतात. त्यामुळे हृदयाचे ठोके पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणाही या केंद्रांमध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या जवळपास २० लाखांच्या घरात असून विविध कामानिमित्त आसपासच्या शहरांमधून ठाण्यात दररोज येणाऱ्या नागरिकांचा आकडा तीन ते चार लाख इतका आहे. ठाणे महापालिकेचे कळवा भागात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असून तिथे सर्व प्रकारच्या प्राथमिक तसेच दुय्यम दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्यात येतात. याशिवाय प्रभाग समितीनिहाय २५ आरोग्य केंद्र व पाच प्रसूतिगृह असून तेथेही आरोग्य सेवा पुरविण्यात येतात. असे असले तरी महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये डायलिसिस सुविधा नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. खासगी रुग्णालयांमधील ही सुविधा अनेकांना परवडणारी नसते. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने शहरातील विविध भागात डायलिसिस केंद्रे उभारणीचा निर्णय घेतला असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच ही केंद्रे सामाजिक संस्थेद्वारे चालविण्यात येतील.\

या ठिकाणी केंद्रे
*हिरानंदानी येथील दवाखान्यासाठी बांधण्यात आलेली इमारत
*लोकमान्यनगर येथील लोकमान्य टिळक रुग्णालय
*घोडबंदर रुग्णालय (मुच्छला महाविद्यालयाजवळ)
*सी. आर. वाडिया दवाखाना
*कोपरी येथील लखिमचंद फतिचंद प्रसूतिगृह
अद्ययावत वैद्यकीय सेवा
डायलिसिस प्रक्रियेत रुग्णांच्या शरीरातील संपूर्ण रक्त शरीराबाहेर काढून विविध प्रक्रियेद्वारे डायलेसिस यंत्रणामध्ये अशुद्ध रक्त शुद्घ करण्यात येते. या उपचारादम्यान काही वेळेस रुग्णाच्या हृदयाचे ठोके बंद पडले तर त्याला पुन्हा कार्यरत करण्यासाठी ठरावीक शॉक द्यावा लागतो. त्यामुळे अशा स्वरूपाचे उपचार करण्यासाठी वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता असून त्या पाचही केंद्रांत उभारणीचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.