अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवलीतील गृहिणींचा उपक्रम; खरेदीदारांकडूनही पसंती

ठाणे : करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही नागरिक बाजारपेठेत जाऊन खरेदी करण्याऐवजी ऑनलाइनच्या माध्यमातून खरेदी करू लागले असून हीच बाब लक्षात घेऊन काही गृहिणींनी गणेशोत्सवात लागणारे सजावटीचे साहित्य आणि गौराईसाठी लागणारे वस्त्र, खाद्यपदार्थ आणि ते पदार्थ त्वरित बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची ऑनलाइनच्या माध्यमांतून विक्री सुरू केली आहे. त्यास नागरिकांकडूनही चांगली पसंती मिळत आहे.

गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे आनंद आणि उत्साहाचे वातावरण. या उत्साहाचे प्रमुख कारण म्हणजे या दहा दिवसांत चविष्ट अशा विविध खाद्यपदार्थाची चव चाखायला मिळते. या दहा दिवसांत गृहिणी मोदकाचे विविध प्रकार त्याचबरोबर पुरणपोळीसारखे खाद्यपदार्थ अगदी आवर्जून करतात. यातील अनेक महिलांना आपली नोकरी व्यवसाय सांभाळत हे पदार्थ बनविताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे अनेक महिला शहरातील मोठय़ा उपहारगृहांतून हे सगळे खाद्यपदार्थ मागविण्याला प्राधान्य देतात. याच गोष्टी लक्षात घेऊन अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये कमी पैशात आणि अगदी घरगुती पद्धतीने बनविलेल्या खाद्यपदार्थाची आणि ते पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची गृहिणींनी ऑनलाईन विक्री सुरू केली आहे.

उकडीचे मोदक म्हणजे गणेशोत्सवातील मानाचा खाद्यपदार्थ. हे मोदत तयार करण्यासाठी लागणाऱ्या उच्च प्रतीच्या तांदळाच्या पिठाची ऑनलाइन विक्री करण्यात येत आहे. आयते पीठ मिळत असल्याने हे मोदक बनविणे महिलांसाठी अगदी सोपे होत असल्याने त्याची चांगलीच विक्री होत आहे. त्याचबरोबर खान्देश प्रांतात तयार केले जाणारे मांडे म्हणजेच खापरावरची पुरणपोळी. मोठय़ा आकाराच्या मातीच्या माठावर तयार केल्या जाणाऱ्या या पुरणपोळींची काही महिलांनी ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर अनेक नागरिकांनी या पुरणपोळींची आगाऊ मागणीही केली असल्याचे विक्रेत्या महिलांनी सांगितले.

प्रसादासाठी लागणारे विविध प्रकारचे लाडू आणि इतर पदार्थाचीही या महिला विक्री करत आहे. गौराईच्या मूर्तीसाठी लागणारे दागिने, विविध प्रकारच्या साडय़ा आणि इतर आभूषणे त्याचबरोबर गणेशमूर्ती साठी लागणारी वस्त्रे आणि इतर पूजेचे साहित्यही या महिलांकडून ऑनलाइन स्वरूपात विकले जात आहे. वेळेअभावी गणेशोत्सवात विविध खाद्यपदार्थ बनवता येत नाहीत. अशा वेळी अगदी घरघुती पद्धतीने बनविण्यात आलेले पदार्थ किंवा ते त्वरित बनविण्याचे साहित्य मिळाल्याने वेळही वाचतो आणि स्वादिष्ठ पदार्थाची चवही चाखता येत असल्याचे ऑनलाइन खाद्यपदार्थ विकत घेणाऱ्या ग्राहकांनी सांगितले.

दैनंदिन नोकरी सांभाळत गणेशोत्सवात विविध खाद्यपदार्थ करणे अनेक महिलांना शक्य होत नाही. अशा वेळी आयती सामग्री मिळत असल्याने या महिलांचा वेळ वाचतो. या सर्व खाद्यपदार्थाची आणि आयत्या सामग्रीची चांगली विक्री होत असल्याने आमच्या सारख्या गृहिणींना एक रोजगारही मिळत आहे.

– अंजली गोखले, मोदक साहित्य विक्रेत्या, अंबरनाथ