भाविकांना दरुगधीचा त्रास; सफाई कामगारांचा कामचुकारपणा सुरूच
कामात हलगर्जीपणा केला म्हणून महापालिका आयुक्तांनी २५ सफाई कामगारांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला निलंबित केले. या कारवाईपासून धडा घेण्यास सफाई कामगार तयार नसल्याचे दिसून येते. टिटवाळा शहर परिसरात नियमित कचरा उचलला जात नसल्याने टिटवाळा, मांडा परिसरांत जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या दरुगधीमुळे रहिवासी हैराण झाले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर ही कचराकोंडी आणखी वाढल्याने या सर्व पट्टय़ात संताप व्यक्त होत आहे.
महागणपतीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक टिटवाळ्यात येतात. त्यांनाही हे श्रद्धेचे ठिकाण गलिच्छ असल्याचे पाहून आश्चर्य वाटत आहे. वर्षांनुवर्षे आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांच्या आशीर्वादाने काम करण्याची सवय सफाई कामगारांना जडली आहे. त्यामुळे या सफाई कामगारांना झोकून काम करणे अवघड जात आहे. असे कर्मचारी आरोग्य निरीक्षकाशी साटेलोटे करून दांडी मारण्यात धन्यता मानत असल्याचे समजते. त्याचा फटका शहरातील सार्वजनिक स्वच्छतेला बसत आहे.
टिटवाळा पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसर, एकदंत नगर, पंचवटी सोसायटी, जय मल्हार चौक परिसरात नियमित कचरा उचलला जात नसल्याच्या या भागातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर कचऱ्याच्या ढीगांचे दर्शन नागरिकांना होते. निमकर नाका, स्टेट बँक, विनायक पार्क, इंदिरानगर, नांदप रस्ता परिसरात जागोजागी कचरा पडला आहे.
महापालिकेच्या अप्रभागातील अधिकाऱ्यांकडे कचरा उचलण्यासाठी रहिवाशांकडून तक्रारी करण्यात येतात, पण त्याची दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात येते. कर्मचारी अपुरे आहेत. लवकरच कचरा उचलला जाईल, असे साचेबद्ध उत्तर कर्मचाऱ्यांकडून देण्यात येते. टिटवाळातील सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी पालिका आयुक्तांना टिटवाळा भागाचा दौरा करून या भागातील कचऱ्याची समस्या जाणून घेण्याचे सूचित केले आहे, पण त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे देशेकर यांनी म्हटले आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील निवांत ठिकाण म्हणून या भागात नव्याने उभ्या राहत असलेल्या गृहसंकुलांमध्ये रहिवासी मोठय़ा संख्येने राहण्यास येत आहेत. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या या रहिवाशांना ही निवांत नगरी आहे की कचरा नगरी, असा प्रश्न पडत आहे.
टिटवाळा, मांडा परिसरांत कचरा उचलण्यात कोणतीही अडचण नाही. त्या भागातील कचरा नियमित उचला जात आहे. काही तक्रारी असतील तर त्या सोडविण्यात येतील.
– विलास जोशी, साहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी

कामगारांचे रजेसाठी अर्ज
अंग झोकून काम करणे अंगवळणी नसल्याने अनेक सफाई कामगार महापालिकेच्या ताठर भूमिकेमुळे अस्वस्थ झाले आहेत. रोज कामावर जाऊन सफाई करणे अनेक कामगारांना अनेक वर्षांच्या आरामाच्या सवयीमुळे जमत नाही. अशा कामचुकार सफाई कामगारांनी रजेचे अर्ज अधिकाऱ्यांकडे करण्याचा सपाटा लावला आहे.