डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी घरडा सर्कल जवळील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडागृहात ४ जून रोजी होणार आहे. या कालावधीत क्रीडासंकुला बाहेरील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक येण्याची शक्यता विचारात घेऊन सावळाराम महाराज क्रीडासंकुला समोरील घरडा सर्कल लगतचे सर्व रस्ते ४ जून रोजी पहाटे पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक विभागाकडून बंद ठेवण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कालावधीत नागरिकांनी घरडा सर्कल जवळील पर्यायी रस्ते मार्गावरून वाहतूक करण्याची सूचना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, प्राणवायू सिलिंडर, अग्निशमन यंत्रणा, पोलीस वाहने, हरित मार्गिका यांच्यासाठी मात्र घरडा सर्कल रस्ता खुला राहील.

हेही वाचा… समृद्धी महामार्गाच्या आणखी एका मजूराचा निष्काळजीमुळे मृत्यू, नवयुगा कंपनीच्या कर्मचाऱ्यासह मजूर ठेकेदार अटकेत

कल्याण-शिळफाटा, कल्याण, बदलापूर परिसरातून येणारी वाहने घरडा सर्कलमार्गे डोंबिवली शहरात प्रवेश करतात. या वाहनांच्या धावेमुळे या भागात वाहन कोंडी होण्याची शक्यता विचारातून घेऊन मतमोजणीच्या दिवशी घरडा सर्कल रस्ता वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.

बंद रस्ते व पर्यायी मार्ग

डोंबिवली शहरातून टिळक चौक, शेलार नाका मार्गे घरडा सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवम रुग्णालय येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. ही वाहने शिवम रुग्णालय येथे उजवे वळण घेऊन डोंबिवली जीमखाना, सागर्ली मार्गे इच्छित स्थळी जातील.

सुयोग हाॅटेैल, रिजन्सी अनंतम, पेंढरकर महाविद्यालय मार्गे घरडा सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आर. आर. रुग्णालय येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने आर. आर. रुग्णालय येथे डावे वळण घेऊन मिलापनगर, कावेरी चौक येथून इच्छित स्थळी जातील.

खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली रस्ता, पंचायत बावडीकडून येणाऱ्या, विको नाक्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदिश पॅलेस हाॅटेलजवळ वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात येणार आहे. ही वाहने खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता, टाटा नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

आजदेगाव, आजदेपाडा कमान येथून घरडा सर्कलकडे येणाऱ्या, बंदिश पॅलेसकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना घरडा सर्कल येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने घरडा सर्कल येथे येऊन शिवम रुग्णालयाकडे जाऊन तेथून ती डोंबिवली जीमखाना मार्गे इच्छित स्थळी जातील.

विको नाकाकडून बंदिश पॅलेसकडे हाॅटेलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हाॅटेल मनीष गार्डन येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने मनीष गार्डनजवळ उजवे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gharda circle road in dombivli closed on june 4 for kalyan lok sabha votes counting asj