स्वतंत्र क्रीडांगणे उभारण्यासंदर्भात क्रीडा विभागाची चाचपणी
क्रिकेट या एकमेव खेळाची सद्दी चालणाऱ्या ठाणे शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये येत्या काळात हॉकी आणि फुटबॉल या मैदानी खेळांचा मार्गही प्रशस्त करून देण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. विविध राजकीय पक्षांकडून या प्रशस्त अशा मैदानाचा कला, क्रीडा कार्यक्रमांसाठी नियमित वापर सुरू असतो. या शिवाय या ठिकाणी अ‍ॅथलिटपटूंसाठी सिंथेटिक ट्रक टाकण्याचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात आहे. या पाश्र्वभूमीवर हॉकी आणि फुटबॉलसाठी या मैदानात स्वतंत्र क्रीडांगणे उभारता येऊ शकतात का, याची चाचपणी क्रीडा विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. हे करत असताना क्रिकेटच्या खेळपट्टीला बाधा पोहचणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.
ठाणे शहराला खेटून असलेल्या मुंबई आणि नवी मुंबई शहरातील क्रीडा प्रेक्षागृहांमध्ये क्रिकेटचे बहुचर्चित असे सामने होत असले, तरी दादोजी स्टेडियमचे दरवाजे तांत्रिक कारणांमुळे रणजी सामन्यांसाठीही खुले होऊ शकले नाहीत. त्यामुळे ठाणे महापालिकेचा पांढरा हत्ती एवढीच काय ती या स्टेडियमची ओळख बनली आहे. गेल्या वर्षांपासून क्रिकेटला पर्याय म्हणून हे स्टेडियम अ‍ॅथलेटिक्सच्या सरावासाठीही खुले करून देण्यात आले आहे. या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक टाकण्याचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात आहे. सद्य:स्थितीत अ‍ॅथलेटिक्सच्या खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानात सराव करावा लागत आहे. या ठिकाणी सद्य:स्थितीत क्रिकेट खेळासाठी खेळपट्टय़ा तयार करण्यात आल्या असून त्याची देखभाल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाते. या खेळपट्टय़ांवर क्रिकेटच्या स्थानिक पातळीवरील स्पर्धावगळता अन्य स्पर्धा होत नाहीत. हे लक्षात घेऊन हॉकी, फुटबॉल अशा खेळांसाठीही हे मैदान खुले करून देण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला आहे.
दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात फुटबॉल आणि हॉकीचे मैदान उभारण्यासाठी महापालिकेत सत्तेवर असलेला शिवसेना पक्ष कमालीचा आग्रही असल्याचे बोलले जात आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत स्टेडियमची पाहाणी केली. त्यावेळी त्यांनी हे मैदान हॉकी आणि फुटबॉलसाठीही खुले करून दिले जावे, अशा सूचना केल्या. आदित्य यांची ही सूचना प्रशासनाने मान्य केली असून त्यादृष्टीने हालचाली केल्या जात आहेत. ठाणे तसेच आसपासच्या परिसरात हॉकीसाठी सुसज्ज असे मैदान नाही. त्यामुळे दादोजी स्टेडियममधील काही भाग हॉकीच्या मैदानासाठी राखून ठेवला जाऊ शकतो, असा दावा अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी केला.