भिवंडी येथील समदनगर परिसरात रहाणाऱ्या डॉ. शबिना शकील शेख यांचे घर फोडून चोरटय़ांनी सोमवारी रात्री सुमारे १३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. भिवंडी परिसरातील समदनगर परिसरात डॉ. शेख राहतात. त्या काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. सकाळी घरी परतल्यावर त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे लक्षात आले. घरातील ४ लाख ५० हजार रुपयांचे दागिने आणि सुमारे आठ लाख ७० हजार रुपयांचे इतर ऐवज चोरटय़ांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून यामुळे रहिवाशी काहीसे धास्तावले आहेत. दोन दिवसांपूर्वी कळवा आणि कापुरबावडी परिसरातील लोढा संकुलात अशाच प्रकारे घरफोडीची घटना घडली होती.