Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण या त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं. प्रसारमाध्यमांनी त्यांना यावेळी अजेंडा काय? हे विचारलं तेव्हा त्याचं उत्तर दिलं तसंच लीड कितीचा असणार हे देखील विचारलं त्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आतापर्यंत म्हणजेच १९९९ पासून एकही निवडणूक हरलेली नाही. महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी व्यक्त केला आहे.

माझ्यावर ज्यांनी विश्वास दाखवला त्या सगळ्यांचे मी आभार मानतो

“भारतीय जनता पक्षाचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह या सगळ्यांचे मी आभार मानतो. मला सहाव्यांदा विधानसभेची उमेदवारी दिली. मी माझा उमेदवारी अर्ज भरला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की सभागृहाचा सदस्य म्हणून जनतेने माझं काम पाहिलं आणि सेवाही पाहिलं आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे सरकार आहे तेच पुन्हा सत्तेवर येईल हा माझा विश्वास आहे.” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले. तसंच त्यांना निवडणुकीचा अजेंडा काय असेल विचारलं असता त्यावरही त्यांनी उत्तर दिलं.

महायुतीचं सरकार पुन्हा येईल

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा येईल याची मला खात्री वाटते आहे. लोकांनी आमचं काम पाहिलं आहे. तसंच नागपूरमधल्याही सगळ्याच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू असा विश्वासही आज देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी व्यक्त केला.

हे पण वाचा- उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात शक्तीप्रदर्शन; मविआला लक्ष्य करत म्हणाले, “लाडक्या बहिणी विरोधकांना…”

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर टीका

“नाना पटोले यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन नाना पटोलेंनी केलं आहे. राहुल गांधींनी जे विचार मांडले तशी मानसिकता पंडीत नेहरुंचीही होती. इंदिरा गांधींचीही होती आणि राजीव गांधींचीही होती. आता राहुल गांधी हे परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. तसंच पटोलेंनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. पण भारताचं संविधान आहे आणि भारतात भाजपा आहे तोपर्यंत आरक्षणाला कुणीही हात लावू शकणार नाही. “

गुलाबी रंगाचं जॅकेट का घातलंत?

माझ्या मनातला रंग भगवा आहे. पण मी सगळेच रंग वापरतो. हा एकच रंग वापरतो असं नाही. असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

Story img Loader