कल्याण : पावसाळ्यापूर्वीची जलशुध्दीकरण आणि उदंचन केंद्रातील अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करायची असल्याने कल्याण डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा येत्या गुरुवारी (ता.२ मे) सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे तांत्रिक अभियंता रमेश गोरे यांनी सांंगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेच्या उल्हास नदी काठच्या मोहिली येथील १५० दशलक्ष लीटर उदंचन केंद्रातील पाणी नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात सोडून ते डोंबिवली पूर्व, पश्चिम शहरांना पुरवले जाते. १०० दशलक्ष लीटर मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी कल्याण शहराच्या काही भागांना वितरित केले जाते. या जलशुध्दीकरण आणि उदंचन केंद्रांंना महावितरणच्या टाटा पाॅवर कांबा येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या वीज पुरवठा केंद्राच्या कांबा येथील उपकेंंद्रात दुरुस्तीचे काम गुरुवारी हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा यंत्रणेला होणारा वीज पुरवठा या दिवशी बंद राहणार आहे.

हेही वाचा : ‘शिक्षण हक्क’च्या नावाने फसवणूक! ‘आरटीई’च्या नव्या नियमावलीविरोधात पालक आक्रमक

नऊ तास हे देखभाल दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहरांना, ग्रामीण भागातील टिटवाळा, वडवली, आंबिवली, अटाळी, मोहने, शहाड परिसराला होणारा पाणी पुरवठ बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने शुक्रवारी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पुरेसा साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan dombivli no water supply on thursday 2 may 2024 css