कल्याण – मुरबाड तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाकडून एकात्मिक हमीभाव योजनेंतर्गत ७० हजार क्विंटल भाताची हमीभावाने मुरबाड शेतकरी सहकारी संघाने खरेदी केली आहे. खरेदी केलेले भात ठेवण्यासाठी पुरेसी गोदामे मुरबाड तालुक्यात नसल्याने शेतकरी सहकारी संघाला मोकळ्या मैदानांमध्ये भात ठेवण्याची वेळ आली आहे. मैदानात पुरेशी जागा नसल्याने रस्त्यापर्यंत भात गोण्यांच्या थप्प्या लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुरबाड तालुक्यात पुरेशी गोदामे उभारावीत यासाठी आमदार किसन कथोरे शासनाकडे प्रयत्न करत आहेत. मागील तीन महिन्यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रादेशिक कार्यालयांतर्गत शासनाने हमीभावाने शेतकऱ्यांकडून भात खरेदी सुरू केली. या खरेदीची मुदत फेब्रुवारी अखेरपर्यंत शासनाकडून वाढविण्यात आली आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा >>>शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचे धरणे आंदोलन

गेल्या तीन महिन्यापूर्वी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले भात मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने मुरबाड मधील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील दोन, एमआयडीसीत एक गोदामात भरून ठेवले आहे. भात खरेदीचा ओघ सुरू असल्याने ताब्यातील भात ठेवण्यासाठी आता मुरबाड तालुका शेतकरी संघाला जागा नाही. हे भात मोकळ्या मैदानात ठेवण्यात आले आहे. आता मैदानात जागा शिल्लक नसल्याने खरेदीचे भात रस्त्याच्या कडेला पोत्यांमध्ये थप्प्या लावून ठेवण्यात येत आहे. शासन गोदामातील भात उचलत नाही आणि खरेदीचा ओघ थांबविणे शक्य नाही, अशा कात्रीत मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघ सापडला आहे.

अवकाळी पावसाची भीती असल्याने मैदानातील हमीभावाने खरेदी केलेले भात भिजले तर शासनाचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. याची जाणीव ठेऊन शहापूर, मुरबाड परिसरातील अन्य गोदामे ताब्यात घेऊन तेथे मैदानातील, रस्त्यावरील भात ठेवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार आहे, असे मुरबाड तालुका शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ दळवी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>दिवा रेल्वे स्थानकात फटका गँगमुळे प्रवाशाने गमावला हात, ठाणे रेल्वे पोलिसांनी केली चोरट्यास अटक

मुरबाड तालुक्यात पाच हजार २३० शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामधील दोन हजाराहून अधिक शेतकऱ्यांंनी भात विक्री केली आहे. तीन हजार शेतकरी भात विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. खरेदीचे भात ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने काही दिवस भात खरेदी बंद केली होती. खेड्यातून दूरवरून शेतकरी भात घेऊन येत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे खरेदी पुन्हा सुरू केली. ही मुदत २९ फेब्रुवारीपर्यंत आहे, असे शेतकरी संघाचे अध्यक्ष किसन गिरा यांनी सांगितले.

हमीभावाचा दर यावर्षी दोन हजार १८० रुपये आहे. ठाणे,पालघर, रायगड जिल्ह्यात एकूण एक लाख ९९ हजार क्विंटल भात खरेदी झाली आहे. या खरेदीची शासन दराने किंमत सुमारे ४३ कोटी आहे, असे आदिवासी विकास मंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी सांगितले.

गोदामांअभावी मुरबाड मध्ये हमीभावाने खरेदी केलेले भात ठेवण्याचा पश्न निर्माण झाला आहे. तीन गोदामांमधील भात उचलण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहोत.-किसन गिरा,मुरबाड तालुका शेतकरी संघ.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In murbad 70000 quintals of rice was kept in the ground due to lack of godowns amy
First published on: 21-02-2024 at 10:44 IST