ठाणे: शहापूर तालुक्यातील ज्या गाव – पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी नियोजन करून वाढीव टँकर पुरविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने एप्रिल महिन्यात करण्यात आले होते. मात्र हे नियोजन केवळ कागदोपत्रीच राहिले असून मे महिन्याचा अखेर उजाडला असूनही शहापूर तालुक्यातील गावांना अधिकचा पाणी पुरवठा उपलब्ध होऊ शकलेला नाही. तर दुसरीकडे जलजीवन मिशनच्या माध्यमातून संपूर्ण शहापूर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून केवळ जलवाहिन्या टाकून प्रत्येक घरात नळ जोडणी देण्यात आली आहे. मात्र याद्वारे पाणी पुरवठाच सुरू केला नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूर तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या जाणवत असते. जिल्हा परिषद तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येतात. विंधन विहिरींची उभारणी, ‘जल मिशन’ द्वारे पाण्याचा पुरवठा, ‘हर घर जल मिशन’ यांसारख्या विविध योजनांची अंमलबाजवणी या दोन्ही तालुक्यांतील गावांत करण्यात येत आहे. मात्र या योजना केवळ कागदोपत्रीच असल्याने दरवर्षी प्रमाणे यंदाही शहापूर वासियांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पासूनच शहापूर तसेच मुरबाड तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली होती. पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून शहापूर तालुक्यातील काही गाव पाड्यांमध्ये टँकरने आणि पुरवठा सुरू केला होता. मात्र गेल्या महिन्यात ज्याप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढू लागला त्याचप्रमाणे शहापूर मध्ये पाणीटंचाईची समस्या देखील अधिक तीव्र होऊ लागली. पाणीटंचाईची समस्या कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने एप्रिल महिन्यात शहापूर तालुक्यात वाढीव टँकर देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र अद्यापही शहापूर तालुक्यात परिस्थिती तशीच कायम असल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याच पाणीटंचाईला त्रस्त होऊन ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासकीय कार्यालयांवर हंडा मोर्चा देखील काढला होता. मात्र त्याचाही प्रशासनावर काही फायदा झाला नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : कापूरबावडी उड्डाणपूलावर वाहन उलटले, कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

जल जीवन मिशनचे नेमके झाले काय ?

मागील एक ते दीड वर्षाच्या कालावधीत शहापूर तसेच मुरबाड तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन राबविण्यात आले. या अंतर्गत शहापूर तालुक्यात जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले. तसेच प्रत्येक घरात यातून नळ जोडणी देखील देण्यात आली आहे. मात्र अद्याप या नळांद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे यांना जोडण्याचे काय करायचे असा सवाल आता संत शहापूरवासीय करत आहेत. तर ३० मार्च रोजी शहापूरला या जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले होते. मात्र हा मुहूर्त नेमका हुकला कुठे याबाबत जिल्हा प्रशासन निरुत्तर आहे.

हेही वाचा : दिवा येथील ठाणे पालिकेच्या कचराभूमीवर बेकायदा चाळी

विहिरी नको टाक्या हव्या

जिल्हा प्रशासनाकडून पाणीटंचाईची समस्या कमी करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरीही तो अपुराच असल्याचे दिसून येत आहे. त्यातही टँकर मधून येणारे पाणी हे विविध गाव पाड्यांमध्ये विहिरींमध्ये टाकण्यात येते. सध्याची तीव्र उन्हाळ्याची परिस्थिती पाहता हे सर्व पाणी कोरड्या ठाक पडलेल्या विहिरींमध्ये झिरपून जाते. यामुळे हे टँकरचे पाणी देखील नागरिकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाही. यामुळे टँकर मधून येणारे पाणी विहिरींमध्ये नको तर टाक्यांमध्ये खाली करण्यात यावे द्यावे अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहे. तर येथील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असल्याची प्रतिक्रिया येथील पाणी टंचाईवर काम करण्याऱ्या श्रमजीवी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा : बाष्पी भवनामुळे ठाणे जिल्ह्यातील धरणांच्या पातळीत घट, पाऊस उंबरठ्यावर असल्याने पाणी कपातीची शक्यता नाही

सद्यस्थिती काय ?

एकूण टंचाई ग्रस्त गाव पाडे
मुरबाड – १२ गावे
लोकसंख्या – १३ हजार १७८
टँकर संख्या – केवळ ५

शहापूर

गावे – ४१
लोकसंख्या – ६० हजार ४९
टँकर संख्या – ४२

टँकरची संख्या वाढविणे गरजेचे आहे. कडाख्याच्या उन्हात पाण्यासाठी रोज रोज फिरणे अशक्य आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात हीच स्थित आहे. तर नळ जोडणी अनेक महिने झाले पाणी मात्र नाही. ते नळ देखील घराच्या बाहेरील भागात असल्याने आता जनावरही नळांचे नुकसान करत आहे.

ग्रामस्थ, शहापूर तालुका