प्राच्य विद्या संस्थेने त्यांच्या संग्रही असलेले आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांचे दालन संशोधकांसाठी खुले केले आहे. संशोधकांनी हाजुरी येथील संस्थेच्या ग्रंथालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते पाच दरम्यान या संशोधक पत्रिका उपलब्ध असतील, अशी माहिती प्राच्य विद्याच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात करण्यात आली आहे.
कला, साहित्य, विज्ञान आदी निरनिराळ्या विषयांवरील नवे संशोधन इंग्लंड-अमेरिकेतील विद्यापीठे, ग्रंथालये आणि वस्तुसंग्रहालये अशा पत्रिकांमधून नियमितपणे प्रसिद्ध करीत असतात. संशोधकांसाठी या पत्रिका उपयुक्त असल्या तरी त्यांचे शुल्क अनेकांना परवडत नाही. कारण परकीय चलनात त्यांची वर्गणी भरावी लागते. संशोधकांची ही गरज ओळखून प्राच्य विद्याने त्यांच्याकडे येणारे साहित्य, संग्रहालयशास्त्र, कला, विज्ञानेतिहास, पुरातत्त्व आदी विषयांच्या संशोधन पत्रिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटीश जर्नल ऑफ सायन्स हे विज्ञान इतिहासाचे नियतकालिक, रॉयल एशियाटिक सोसायटी आणि अमेरिकन ओरियंटल सोसायटीचे अंक, लंडन टाइम्सची साहित्यविषयक पुरवणी, लंडन रिव्यू ऑफ बुक्स आदी पत्रिका संशोधकांना येथे पाहता आणि अभ्यासता येणार आहेत.