दिल्लीत कारवाई; तिघांना दहा दिवस कोठडी
आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंब्य्रातील आणखी एका तरुणाला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्यासह अटक करण्यात आलेल्या आणखी दोन तरुणांना राष्ट्रीय तपास संस्थेची दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
मोहम्मद फरहान मोहम्मद शेख (२४, महाराष्ट्र) असे या तरुणाचे नाव असून त्याच्यासह शेख अझर उल इस्लाम (काश्मीर) आणि आदनान हुसेन (कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या इतर तरुणांची नावे आहेत. आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतलेला मोहम्मद फरहान मोहम्मद शेख (२४) हा तरुण ठाणे जिल्ह्य़ातील मुंब्रा शहरातील रहिवाशी आहे. तो लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. तेव्हापासून तो आजी मेहरूनिसा मोहम्मद सफी नाटेकर हिच्यासोबत राहतो.
मुंब्रा-कौसा भागातील दोस्त या इमारतीमध्ये त्याची आजी राहते. तिनेच त्याचा लहानपणापासून सांभाळ केला. मुंबईतील एका महाविद्यालयात त्याने बी.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. सुमारे अडीच वर्षांपूर्वी तो सौदीमधील एका कंपनीत नोकरी करण्यासाठी गेला होता. दरम्यान, दहशतवादी कारवायांच्या संशयावरून गेल्या जून महिन्यात सौदी सरकारने त्याला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्या घराची झडती घेऊन त्याचा लॅपटॉप तपासणीसाठी ताब्यात घेतला होता. त्या वेळी त्याने आजीशी संपर्क साधून निर्दोष असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दहशतवादी कारवायांच्या संशयावरून सौदी सरकारने त्याच्यासह दोघांना भारतात पाठविले असून या तिघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्लीतून ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर ठाणे पोलिसांनी त्याच्या मुंब्य्रातील घराची तपासणी केली. मोहम्मद निर्दोष असल्याचा दावा त्याच्या आजीने पत्रकारांशी बोलताना केला. आयसिसचा भारतातील म्होरक्या मुदब्बीर शेख याला मुंब्य्रातून अटक झाल्याच्या घटनेला पंधरा दिवस उलटत नाहीत, तोच आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंब्य्रातील मोहम्मदला ताब्यात घेण्यात आले आहे.