ठाणे : येथील सावरकरनगर भागातील जलकुंभाच्या छताच्या स्लॅबचा भाग टाकीत कोसळल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने जलकुंभाच्या बांधकामाचे संरचनात्मक परीक्षण करून घेतले होते. त्याचा अहवाल नुकताच महापालिकेला प्राप्त झाला असून त्यात स्लॅबची दुरुस्ती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनाने आता दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील सावकरनगरमध्ये २५ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरम्णाने ३५ वर्षांपूर्वी जलकुंभाची उभारणी केली होती. या जलकुंभाच्या छताच्या स्लॅबचा भाग टाकीच्या आत कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. गेल्या दोन वर्षांपासून या जलकुंभाचा स्लॅब कमकुवत झाला असून त्याच्या दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरमेप स्थानिक नागरिकांनी केला होता. स्लॅब कोसळण्याच्या घटनेनंतरही जलकुंभातून सावरकरनगर, इंदिरानगर, आंबेवाडी, महात्मा फुलेनगर, लोकमान्यनगर यांसह इतर सात भागांचा पाणीपुरवठा सुरूच ठेवण्यात आला आहे. तसेच या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने जलकुंभाच्या बांधकामाचे संरचनात्मक परीक्षण करून घेतले होते. त्याचा अहवाल नुकताच पालिकेला प्राप्त झाला असून त्यात स्लॅबची दुरुस्ती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हे बांधकाम जुने झाले असल्यामुळे छताचा भाग कोसळला असल्याचा अंदाज पालिका प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. तसेच अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार दुरुस्ती कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.