कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेने गेल्या नऊ महिन्यात केलेल्या वृक्षगणनेत शहरात सात लाखाहून अधिक वृक्ष आढळून आले आहेत. या वृक्ष गणनेच्यावेळी २६५ विविध प्रकारच्या वृक्षांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. यामधील दोन हजार ६५० वृक्ष हे वारसा वृक्ष आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून एका खासगी संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षी जून महिन्यात वृक्ष गणनेला सुरूवात करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या विविध भागात असलेल्या झाडांची गणना या संस्थेतील कर्मचारी करत आहेत. संबंधित झाडाची प्रजाती, त्याचा आकार, उंची, ते झाड किती जुनाट आहे याचा अंदाज या गणनेच्यावेळी काढून त्याची सविस्तर नोंद केली जात आहे.

हेही वाचा…कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी एकत्रित बस सेवेचा विचार; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची माहिती

या गणनेतून शहरातील हरितपट्टा वाढविण्याचा विचार प्रशासन करत आहे. पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी शहरातील पर्यावरण संवर्धनाचा विचार करून शहर परिसरात अधिकाधिक वृक्ष लावून हरितपट्टे वाढविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांना उल्हास खाडी, काळू नदीचा किनारा आहे. या नद्यांच्या काठी वनराई आहे. डोंबिवली परिसरात खारफुटीचे जंगल आहे. हे जंगल भूमाफियांनी बेकायदा चाळी, इमारती बांधून नष्ट करण्यास सुरूवात केली आहे. त्याचे संवर्धन करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहेत.

कल्याणमध्ये पारनाका परिसरात जुनाट वड, पिंपळाची झाडे आहेत. गांधारे, बारावे, मोहने, टिटवाळा, आधारवाडी, उंबर्डे, शहाड परिसरत हरित जंगल आहे. डोंबिवलीत टिळक रस्ता, ठाकुर्ली, चोळे, एमआयडीसी, गांधीनगर, पी ॲन्ट टी कॉलनी भागात अधिक संख्येने जुनाट झाडे आहेत. आयरे, सुनीलनगर, जुनी डोंबिवली, कोपर भागात हरितपट्टे आहेत. वृक्ष गणना अद्याप महिनाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे झाडांच्या संख्येत वाढ होणार आहे, असे उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा…वाहन चालकाची दादागिरी… अन् महामार्गावर तीन तास कोंडी

आंबिवली भागात पालिकेने सहा ते सात हजार झाडे लावून निसर्ग उद्यान विकसित केले आहे. विविध प्रकारची जैवविविधता याठिकाणी पाहण्यास मिळते. चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी बगिचे, उद्याने विकसित करण्यावर भर दिला आहे.

हेही वाचा…ठाणे स्थानकातील पादचारी पुलांवर गर्दीचा महापूर

शहरात नागरीकरण होत असले तरी झाडांची संख्याही वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाचे कार्यक्रम करून वाढविली जात आहे. शहरातील हरितपट्टे वाढविण्यावर प्रशासनाचा भर आहे. – संजय जाधव, मुख्य उद्यान अधीक्षक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipality s tree census reveals over 7 lakh trees psg
Show comments