लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या तुलनेत पादचारी पुल तुलनेने कमी असल्याने आता पादचारी पुलांवर प्रवाशांच्या गर्दीचा कडेलोट होत आहे. दररोज प्रवाशांची एकमेकांसोबत रेटारेटी होत असल्याने अनेकदा प्रवाशांचे एकमेकांसोबत वादाचे प्रसंग उद्भवत आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील घटनेची पुनरावृत्ती होते का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

ठाणे शहराचा विस्तार मागील १० ते १५ वर्षांमध्ये घोडबंदर येथील गायमुख पर्यंत झाला असून शहराच्या पायाभूत सुविधेवर ताण पडत आहे. नागरिकरण वाढल्याने ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा भार देखील वाढला आहे. ठाणे स्थानकातून मध्य रेल्वे आणि ठाणे ते वाशी-पनवेल या ट्रान्स हार्बरची रेल्वे वाहतुक होत असते. त्यामुळे ट्रान्स हार्बरने प्रवास करणाऱ्या कर्जत, कसारा ते भांडूप पर्यंतच्या प्रवाशांना नवी मुंबईत जाण्यासाठी ठाणे स्थानकात उतरावे लागते. दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत प्रवाशांचा भार या स्थानकावर येऊ लागला आहे.

आणखी वाचा-ठाणे : कोट्यवधी रुपयांचे ‘हॅश’ तेल जप्त, चार जणांना अटक

ठाणे स्थानकात प्रावाशांना फलाटांवर जाण्यासाठी सहा पादचारी पूल आहेत. यातील एक पादचारी पुल मागील अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत तोडण्यात आला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मुंबई दिशेकडे नवा पादचारी पुल तयार करण्यात आला आहे. परंतु हा पादचारी पुल सर्व फलाटांना अद्याप जोडण्यात आला नाही. त्यामुळे या पादचारी पुलाचा वापर अत्यंत कमी होतो. उर्वरित पादचारी पुलांपैकी केवळ एकच पुल रूंद आहे. त्यातच फलाट क्रमांक दोनवरील जुन्या पादचारी पूलाचे जीने धोकादायक झाल्याने या जिन्यांवर प्रवेश बंद करण्यात आले आहेत. पादचारी पुलांवर आणि जिन्यांवर होणाऱ्या गर्दीचे नियोजन करताना लोहमार्ग पोलिसांच्या देखील नाकी नऊ येत आहेत. रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलांचे नियोजन केले नाहीतर एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकासारखी परिस्थिती उद्भवू शकते असे प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे प्रशासनाने स्थानकातील प्रलंबित पादचारी पुलांची कामे त्वरित मार्गी लावावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

आणखी वाचा-बदलापुरच्या होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण, सोहळ्यापूर्वी महाविकास आघाडीची निदर्शने

मुंबई दिशेकडील पादचारी पुलाचे काम सुरू आहे. लवकरच येथील काम पूर्ण होईल. या पादचारी पुलाचे जिने फलाट क्रमांक ३/४ आणि एक वर सध्या जोडले जाणार नाहीत. तथापि उर्वरित फलाटांवर या पादचारी पुलाचे जिने असणार आहेत. त्यामुळे सध्याच्या पुलांवरील गर्दीचे विभाजन होईल. -प्रविण पाटील, वरीष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे