कुळगाव-बदलापूर नगरपालिका हद्दीतील आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी नगरपालिकेने अखेर हालचाली सुरू केल्या आहेत. याअंतर्गत आरक्षण असलेल्या भूखंड धारकांना व संबंधितांना नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेसाठीचे आरक्षित भूखंड पालिकेच्या ताब्यात अद्याप आले नसल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ने १६ जुलैला प्रकाशित केले होते. या वृत्ताचा दणका बसताच पालिकेच्या नगररचना विभागाने भूखंड धारकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. परंतु यासाठी आवश्यक असलेले अनेक दस्तावेज नगरपालिकेकडे उपलब्ध नसून त्याशिवाय अवघ्या एका लिपिकाकडे हे काम सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षित भूखंडांशी संबंधितांना नोटिसा बजावणे नगरपालिका प्रशासनासाठी तारेवरची कसरत ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिका हद्दीत ११९ आरक्षित भूखंड आहेत. त्यापैकी जेमतेम ३० ते ४० टक्के भूखंड नगर परिषदेच्या ताब्यात आहेत. हे आरक्षित भूखंड लवकरात लवकर ताब्यात घ्यावेत अशी मागणी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून करण्यात आली होती. मात्र याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यावर नोटिसा बजवण्याच्या कार्यवाहीला वेग आला असून आतापर्यंत ६० आरक्षणाशी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. परंतु आरक्षण असलेल्या अनेक भूखंडांशी संबंधित गटबुक, नकाशे व सातबारा नगर परिषदेच्या दप्तरी नाहीत. भूमी अभिलेख विभागाशी पत्रव्यवहार करून हे दस्तावेज मागवण्यात आल्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्याने सांगितले. हे दस्तावेज उपलब्ध झाल्यानंतरच संबंधिताना नोटीस बजावणे शक्य होणार आहे. तसेच या नोटीस  बजावण्याचे काम अवघ्या एका लिपिकावर सोपवण्यात आले आहे. त्यामुळे नोटीस बजावण्याच्या या कामासाठी किती वेळ लागणार याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बदलापूरच्या विकास आराखडय़ाची मुदत २०१६ मध्ये पूर्ण होत असल्याने त्यानंतर अनेक भूखंडांचे आरक्षण बदलू शकते, त्यामुळे नगर परिषदेने हे भूखंड लवकरात लवकर ताब्यात घ्यावेत अशी मागणी सभागृहात सदस्यांनी केली होती. तसेच अलीकडेच भाजपचे नगरसेवक संभाजी शिंदे यांनीही आरक्षित भूखंड लवकरात लवकर ताब्यात न घेतले गेल्यास नगर परिषदेला शेकडो एकर भूखंडाला मुकावे लागेल अशी भीती व्यक्त करत हे आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात  नसल्याचा आरोपही शिंदे यांनी केला होता.

आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. उपलब्ध नसलेले दस्तावेज मिळवण्यासाठी भूमी अभिलेख विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे. नोटीस बजावण्याच्या या प्रक्रियेसाठी किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. हा दैनंदिन कामकाजाचा भाग आहे, कार्यवाही सुरू आहे.
– देविदास पवार, मुख्याधिकारी, कुळगांव-बदलापूर नगर परिषद