ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखाडी परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हा मुख्यमंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने तेथून आपल्या पक्षाला सर्वाधिक मतदान व्हावे, हा त्यांचा प्रयत्ना असून त्यासाठी त्यांनी मतदारांना साद घातली.

कोपरी-पाचपाखाडीमध्ये रविवारी संध्याकाळी म्हस्के यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या प्रचारफेरीत सहभागी झाले. कोपरी-पाचपाखाडी परिसर हा आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. येथून तुम्ही मला निवडून दिले. त्यामुळे मी मुख्यमंत्री झालो. येत्या निवडणुकीत धनुष्यबाणाला मतदान कराल असा शब्द द्या, असे आवाहन शिंदे यांनी केले. तसेच ही निवडणूक केवळ ठाण्याची नाही, तर देशाच्या विकासाची निवडणूक आहे. आपल्या देशाला महासत्ता बनविणारी ही निवडणूक आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे, असेही शिंदे म्हणाले. तुम्ही २४ तास काम करणाऱ्यांना निवडून द्याल की, घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना निवडून द्याल, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघात कोपरी पाचपाखाडीमधून सर्वाधिक मतदान झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा >>> …आणि ठाण्यातील रॅली सोडून मुख्यमंत्री गेले लहानग्याच्या मदतीला धावून

उपचारासाठी तत्परता…

प्रचारफेरी सुरू असताना एक महिला तिच्या नऊ वर्षीय जखमी अवस्थेतील मुलाला रुग्णालयात घेऊन जात होती. या मुलाचा डावा हात उकळत्या तेलामुळे भाजला होता. प्रचारफेरीमध्ये रथावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला आणि तिच्या मुलाला पाहिले. त्यानंतर शिंदे हे तात्काळ रथावरून खाली उतरले. त्यांनी तात्काळ मुलाला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच डॉक्टरांना उपचार सुरू करण्याच्या सूचना केल्या.

ही निवडणूक केवळ ठाण्याची नाही, तर देशाच्या विकासाची निवडणूक आहे. तुम्ही २४ तास काम करणाऱ्यांना निवडून द्याल, की घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना निवडून द्याल?- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री