मॉडेलिंगच्या मोहजालाला भुलून वसईतील अनेक तरुणी एका दुष्टचक्रात अडकत होत्या. बदनामी आणि भीतीपोटी पोलिसांमध्ये तक्रार दाखल होत नव्हती. एका ठकाच्या जाळ्यात एकापाठोपाठ एक मुली फसत होत्या. अशाच एका १९ वर्षीय मुलीला एका ठकसेनाने जाळय़ात अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी जाळे त्याच्यावर उलटले..

वसईच्या नामांकित महाविद्यालयात शिकणारी शिखा आनंदात होती. तिचं मॉडेल बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं. एका नामांकित मॉडेल को-ऑर्डिनेटरकडून तिला ऑफर होती. दिसायला सुंदर असणारी शिखा नुकतीच बारावीला गेली होती. तिला मॉडेलिंगची आवड होती. आतापासूनच त्यासाठी ती प्रयत्न करत होती. तिला एक दिवस फेसबुकवर राहुल नावाच्या एका मॉडेल को-ऑर्डिनेटरची ओळख झाली. कुणाला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे असेल तर माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्याने फेसबुकद्वारे केले होते. शिखाने त्याला संपर्क केला.

आपल्या मॉडेलिंगचा मार्ग मोकळा झाला असे तिला वाटू लागले. तिने राहुलला आपली छायाचित्रे व्हॉटसअ‍ॅपवर पाठवली. मी अनेक मुलींना मॉडेल बनवलंय. अनेक जणी जाहिरातीत आहेत, काही जणी सिनेमातही गेल्याचे त्याने सांगितले. तुला जर मॉडेल बनायचे असेल तर मला भेट. आपण काही आणखी व्यावसायिक पद्धतीने छायाचित्रे काढू, असे त्याने सांगितले. शिखा तयार झाली. नालासोपारा पश्चिमेला राहुलने तिला भेटायला बोलावले. एका गाडीत राहुल होता. शिखाला गाडीत बसवून तो कळंब येथे घेऊन गेला. तेथे समुद्रकिनाऱ्यावर त्याने मोबाइलनेच तिचे काही फोटो काढले. आता आपल्याला काही इनडोअर फोटो शूट करायचे आहे, असे त्याने सांगितले. राहुलने आधीच तेथील एका लॉजमध्ये खोली बुक करून ठेवली होती. तेथे शिखाला नेले. तिला शीतपेय प्यायला दिले. राहुल आपल्या मोबाइलमधूनच तिचे फोटो काढू लागला. त्यानंतर त्याने आणखी काही ग्लॅमरस फोटो हवेत, असे सांगितलं. दरम्यान राहुलने शीतपेयातून दिलेल्या गुंगीच्या औषधाचा अंमल शिखाला चढला होता आणि त्याचा फायदा घेत राहुलने तिच्यावर बलात्कार केला. या वेळी आक्षेपार्ह अवस्थेतील तिचे फोटोही काढले. यानंतर राहुलने आपला खरा डाव उघड केला. ‘तू पन्नास हजार रुपये घेऊन ये, नाही तर तुझे हे सर्व फोटो मी इंटरनेटवर अपलोड करेन’ अशी धमकी दिली. शिखाचा नाइलाज होता. ती फसली गेली.

शिखाच्याच महाविद्यालयात शिकणारी फेमिना ही गुजराती व्यापाऱ्याची मुलगी. जेमतेम १८ वर्षांची. ती तेरावीला शिकत होती. तिलाही मॉडेलिंगची आवड होती. तिनेसुद्धा अशाच पद्धताने राहुलला संपर्क केला होता. राहुलच्या फेसबुकवर अनेक मुली होत्या. राहुलने त्यांना कसे मॉडेल बनवले हे त्यांनी नमूद केले होते. शिखाप्रमाणे त्याने फेमिनालाही फोटोशूटच्या नावाखाली भेटायला बोलावले. फेमिना पैसेवाली होती. तिला येताना पंचवीस हजार रुपये घेऊन यायला सांगितले होते. त्याप्रमाणे ती पैसे घेऊन आली. राहुलने पैसे घेतले. गाडीत तिला बसवले आणि गाडी अर्नाळा समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने गेली. त्याने तिचे बीचवर काही फोटो काढले. त्यानंतर इनडोअर फोटोशूटसाठी अर्नाळा येथील एक लॉजमध्ये नेले. तिथे तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. तेथे तिच्यावरही बलात्कार करून तिचे फोटो काढले. जर आणखी पैसे दिले नाहीत तर हे फोटो इंटरनेटवर टाकायची धमकी दिली. फेमिनाने राहुलला आणखी पन्नास हजार रुपये आणून दिले. फेमिनापण राहुलची शिकार झाली होती.

शीखा, फेमिना यांसारख्या अनेक तरुणी या राहुलच्या आमिषाला बळी पडत होत्या; पण आपली बदनामी होण्याच्या भीतीने त्या गप्प होत्या. याच दरम्यान पालघर पोलिसांनी ‘पोलीस दीदी’ नावाच्या उपक्रमांतर्गत शाळा-महाविद्यालयांत जाऊन तेथील विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून त्या सोडवण्याची मोहीम सुरू केली. या वेळी स्थानिक पोलीस अधिकारी आपले मोबाइल क्रमांक या विद्यार्थ्यांना देत असत व अडचणीच्या वेळी संपर्क साधण्याचे आवाहन करत. शिखा ज्या महाविद्यालयात शिकत होती, त्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या शीतल या १९ वर्षीय विद्यार्थिनीला शीतलच्या बाबतीत घडलेला प्रकार समजला व तिने पोलिसांच्या मदतीने राहुलच्या मुसक्या आवळण्याचे ठरवले.

शीतलने राहुलच्या फेसबुक अकाऊंटवर जाऊन त्याच्याशी संपर्क साधला. राहुलनेही आपल्या नेहमीच्या पद्धतीने सावज पकडण्यासाठी सापळा लावला. त्याने शीतलला भेटायला बोलावले व एका बीचवर घेऊन गेला. तेथे फोटोशूटच्या निमित्ताने तो शीतलशी लगट करू लागला. तेव्हाच शीतलने पोलिसांशी संपर्क साधला. पाच मिनिटांत पोलीस पोहोचले व त्यांनी राहुलला बेडय़ा ठोकल्या. शीतलच्या तक्रारीनुसार राहुलवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यापाठोपाठ शिखा व फेमिना या दोघीही राहुलविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे आल्या. त्यामुळे बलात्कार, पोक्सो, आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. यादव आता न्यायालयीन कोठडीत आहे.

राहुलचे खरे नाव होते रिंकू ऊर्फ संदीप यादव. वय २८ वर्षे. हा नालासोपाऱ्यातील संतोष भुवन येथे एका गलिच्छ वसाहतीत राहत होता. बेरोजगार होता. मुलींना मॉडेलिंगचे वेड असते. त्यासाठी ते काहीही करू शकतात हे त्याने हेरले आणि राहुल नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. वसई-विरारमधील महाविद्यालयातील तरुणी त्याच्या सावज होत्या. अनेक मुली त्याच्या जाळ्यात अडकू लागल्या होत्या. बदनामीपोटी कुणी तक्रारी करत नव्हत्या. ज्या मुलींना आणखी पैसे देणे शक्य होते त्या मुली पैसे देत होत्या. ज्यांना शक्य नव्हते त्या मुलींना तो पुन्हा लॉजवर बोलावत असे. अनेक मुली एकामागून एक त्याच्या जाळ्यात अडकत होत्या. मात्र, शीतलने धाडस दाखवून त्यालाच जाळय़ात अडकवले. त्याबद्दल पालघर पोलीस अधीक्षकांनी शीतलचा सत्कारही केला. तुळींज पोलिसांनी जप्त केलेल्या राहुलच्या मोबाइल व लॅपटॉपमध्ये अनेक तरुणींची छायाचित्रे सापडली. तसेच अनेक तरुणींचे मोबाइल क्रमांकही त्यात सापडले.

‘मॉडेलिंग’ हे क्षेत्र वाईट नाही; पण त्याभोवती असलेले तारांकित वलय अनेक तरुण-तरुणींचे डोळे दिपवून टाकते. अशा वेळी डोळय़ांवर झापड बांधून तरुण-तरुणी मॉडेलिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना फशी पडतात. प्रत्यक्षात या क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्यांनी सजगपणे, आपला कुणी गैरफायदा तर घेत नाही ना याचे भान ठेवून वावरले पाहिजे. अन्यथा राहुलसारख्या ठकसेनांचा फायदा होतो. त्याच वेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांशी संपर्क करून संबंधित आरोपीला गजाआड करण्याचे धैर्यही तरुणींनी दाखवले पाहिजे. अन्यथा इतर मुलीही अशा नराधमांच्या शिकार होऊ शकतात. शीतलने नेमके हेच करून स्वत:सोबत अनेक तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. ती खऱ्या अर्थाने ‘रोल मॉडेल’ ठरली..