मृत्यूच्या पाशातून बचावलेला सुरेश दत्तक पालकांच्या भेटीला

नाव- सुरेश निरगुडे, वय वर्षे ४, वजन फक्त सव्वासात किलो. कुपोषणाची लागण. सुरेश आज आहे उद्या नाही, असे घरातील चिंतेचे वातावरण. औषधोपचरांची सोय नाही. जवळ पैशाचा ठिकाणा नाही. अशा काळजी आणि बेताच्या परिस्थितीत ‘शबरी सेवा समिती’चे प्रमोद करंदीकर वाडीत देवासारखे येतात. सुरेशला तातडीने डोंबिवलीतील एका डॉक्टरकडे आणतात. उपचार सुरू केले जातात. सुरेशवर तातडीने उपचार झाल्याने तो मृत्यूच्या दारातून परत येतो. बघता बघता सुरेश शाळेत जायला लागला. आता इयत्ता आठवीत आहे. आपल्याला एका बाबाने जीवदान दिले आहे, हे समजल्यावर कासावीस झालेल्या सुरेशने नुकतीच प्रमोद करंदीकर यांची गळाभेट घेतली.

offensive song during marriage marathi news
लग्नाच्या वरातीत आक्षेपार्ह गाणे; दोन गट भिडले, तिघे जखमी, चार ताब्यात
vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
sangli lok sabha marathi news, sangli bjp lok sabha marathi news
सांगलीत विरोधकांमधील फूट भाजपच्या पथ्थ्यावरच
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

कर्जत तालुक्यातील मिरसूल वाडीतील ही घटना. मिरसूल वाडीत सुरेश निरगुडे आपल्या कुटुंबीयांसह राहतो. मोलमजुरी, कष्ट करून कुटुंबाचा गाडा चालविणे ही वाडीतील प्रत्येक घरातील परिस्थिती. त्याप्रमाणे निरगुडे कुटुंबाची दिनचर्या होती. चार वर्षांच्या सुरेशला कुपोषणाची बाधा झाली. वजन घटलेले. औषधोपचरासाठी गाठीला दोन पैसे नसल्याने आपल्याला कोणता डॉक्टर उभे करणार, असा यक्ष प्रश्न कुटुंबासमोर उभा होता. सुरेशची एकूण परिस्थिती पाहता तो आज आहे, उद्या नाही अशी चिंता त्याच्या पालकांना होती. अशा परिस्थितीत आदिवासींच्या उत्कर्ष आणि कुपोषणाच्या उच्चाटनासाठी कार्यरत असलेल्या ‘शबरी सेवा समिती’चे प्रमोद करंदीकर हे मिरसूल वाडीत आले. त्यांनी वाडीतील परिस्थिती पाहिली तर एकूण अठरा मुले कुपोषित आढळून आली. त्यामध्ये सुरेशची परिस्थिती एकदम नाजूक होती. करंदीकर यांनी तातडीने सुरेशला उचलले आणि डोंबिवलीतील डॉ. उन्मेष फडणीस यांच्या दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी तातडीने सुरेशवर औषधोपचार सुरू केले. बाहेरून काही औषधे मागविण्यात आली. सुरेशची परिस्थिती सुधारू लागली.

औषधोपचार, पौष्टिक आहार मिळाल्यानंतर चार वर्षांचा सुरेश मृत्यूच्या दारातून बचावला. मिरसूलवाडीतील एका रहिवाशाने सुरेशला ‘तू कुपोषणातून कसा बचावला आणि डोंबिवलीच्या करंदीकर काकांनी तुझ्यासाठी धावपळ केली’ हे सांगितल्यावर कासावीस झालेल्या सुरेशला आपल्या दत्तक पालकांना भेटण्याची ओढ लागली होती. शेवटी गावातील एका रहिवाशाच्या साथीने सुरेशला ‘शबरी सेवा समिती’च्या कर्जतजवळील कशेळी केंद्रात नेले आणि ‘याच करंदीकरांनी तुला डॉक्टरांकडे नेले,’ असे सांगितले.

मिरसूल वाडीतील यापुर्वी कुपोषित असलेली सर्व बालके कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर आली आहेत. अशाप्रकारे राज्याच्या विविध भागातून सुमारे सात ते आठ हजार बालके कुपोषणातून बाहेर आलेली आहेत. आता ती सुदृढ होऊन तरूणाईचे जीवन जगत आहेत. शाळेत जात आहेत. ‘शबरी सेवा समिती’च्या माध्यमातून आदिवासी, ग्रामीण, दुर्गम भागातील कुपोषण उच्चाटनाचे काम सुरूच आहे. कुपोषित मुले निश्चित झाली की त्यांना वेळच्या वेळी औषधोपचार आणि त्यांना पौष्टिक आहार मिळेल, याकडे समितीकडून बारकाईने पाहिले जाते.

प्रमोद करंदीकर, ‘शबरी सेवा समिती’, ज्येष्ठ कार्यकर्ते