कल्याण : येथील बारावे येथील पालिकेच्या घनकचरा विभागाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत केंद्रात साठवण केलेला सुका कचरा जळून खाक झाला. गेल्या दहा दिवसाच्या कालावधीत बारावे घनकचरा प्रकल्पाला लागलेली ही दुसरी आग आहे.

आगीची माहिती समजताच पालिका अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परंतु, हा प्रकल्प शहराबाहेर असल्याने आणि वाऱ्याच्या जोरदार वेगामुळे आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले होते. दूरवरून आगीच्या धुराचे लोट दिसत होते. बारावे परिसरातील उंच इमारतीमधील रहिवासी या प्रकल्पाला लागणाऱ्या सततच्या आगीने त्रस्त आहेत. आग लागल्यानंतर धुराचे लोट घरात येतात. दारे, खिडक्या लावल्या तरी कचऱ्याची दुर्गंधी अनेक दिवस कायम राहते, असे रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा…मुंब्रा येथे आई-वडिलांकडून दीड वर्षांच्या मुलीची हत्या, निनावी पत्रामुळे हत्येचा उलगडा; दफन केलेला मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर

बारावे कचरा प्रकल्पात दररोज सुमारे १०० मेट्रिक टन सुका कचरा साठवण केला जातो. या कचऱ्याचे वर्गीकरण करून तो संबंधित कचरा घटक उत्पादकाकडे पाठविला जात होता. या कचऱ्यात ज्वलनशील घटक अधिक असतात, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुपारच्या वेळेत कडक उन्हामुळे हे घटक अधिक ज्वलनशील होऊन किंवा या कचऱ्यातील काही रासायनिक घटक एकत्र येऊन त्यामधून मिथेन वायू तयार होतो. त्यामुळे आग लागण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

हेही वाचा…ठाणे : उथळसर, नौपाड्यातील काही भागात सोमवारी पाणी नाही

काही वेळा या भागातून जाणारा वाटसरू पेटलेल्या सिगारेटचे थोटूक या कचऱ्यावर फेकून देतो. हळुहळू हे थोटूक अधिक प्रज्वलित होऊन लगतच्या कचऱ्याला पेटते करते. त्यामुळे अशा आगी लागतात. गेल्या आठवड्यातील आगीत प्रकल्पातील कचरा साठवण छत, तुकडे यंत्र, वर्गवारी यंत्राचे नुकसान झाले होते. अशाप्रकारे आगी पुन्हा लागणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दहा दिवसापूर्वी घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यात पुन्हा या भागात आगीची घटना घडली आहे. अशा घटना आधारवाडी कचरा केंद्रावर यापूर्वी होत होत्या. या भागात कचरा सपाटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात कचरा वेचक आणि किंवा वाटसरू फिरकत नाहीत.