बी. कॉम.चे सहावे सेमीस्टर उत्तीर्ण होऊनही पाचव्या सेमीस्टर्सची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. गेल्या चार महिन्यापासून अनेक विद्यार्थी पाचव्या सेमीस्टरची गुणपत्रिका मिळावी म्हणून मुंबई विद्यापीठात फेऱ्या मारत आहेत. तेथे त्यांना कोणीही दाद देत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालक हैराण झाले आहेत.
अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. काही विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अर्ज करायचे आहेत. हातात बी. कॉम.ची गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत. एका विद्यार्थिनीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, आपण बी. कॉम.च्या पाचव्या सेमीस्टरमध्ये नापास झाल्याने एप्रिल मध्ये पाचव्या सेमीस्टरची पुर्नमुल्यांकनासाठी परीक्षा दिली. या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो आहोत. सहाव्या सेमीस्टरची परीक्षा आपण उत्तीर्ण झालो आहोत. पाचव्या सेमीस्टरची गुणपत्रिका हात नसल्याने आपण सहावे सेमीस्टर उत्तीर्ण असुनही आपणास कोठेच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही.
एम. कॉम.ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. काही मॅनेजमेंट कोर्सच्या प्रवेशासाठी आपण अर्ज केला आहे. परंतु, तेथे ‘तुमची विद्यापीठाची अधिकृत कागदपत्र सादर करा मगच आम्ही प्रवेश देऊ’ असे सांगण्यात येत आहे. एकदा प्रवेशाची मुदत निघून गेल्यानंतर संपूर्ण वर्ष फुकट जाण्याची भीती आहे. वर्ष फुकट जाऊ नये म्हणून विद्यापीठ मार्चमध्ये पुर्नमुल्यांकनाची परीक्षा घेते. विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आम्हा विद्यार्थ्यांना बसत असल्याची खंत या विद्यार्थिनीने व्यक्त केली.
या विद्यार्थिनीने गेल्या चार महिन्यात विद्यापीठात पालकांसह अनेक वेळा पाचव्या सेमीस्टरची गुणपत्रिका मिळवण्यासाठी फेऱ्या मारल्या. त्यावेळी तिला ‘तुम्ही इतकी गुणपत्रिका मिळण्याची घाई का लागली आहे. योग्यवेळी गुणपत्रिका मिळेल. आम्हाला पुन्हा पुन्हा काम करायचे नाही. त्यामुळे जेव्हा मागील विद्यार्थ्यांचा निकाल लागेल, तेव्हाच तुम्हाला गुणपत्रिका मिळेल असे सांगण्यात आले. तसेच, परीक्षा
विभागाने मुंबई विद्यापीठाच्या शीर्षक पत्रावर ‘सदर विद्यार्थिनी पाचवे सेमीस्टर उत्तीर्ण आहे. सहावे सेमीस्टर तिने उत्तीर्ण केले आहे. त्यामुळे तिला प्रवेश देण्याचे म्हटले आहे’. पण, प्रवेशाच्या ठिकाणी हे पत्र ग्रा’ा धरण्यात येत नाही, असे या विद्यार्थिनीने सांगितले. विद्यापीठाचा परीक्षा विभाग व अन्य
विभागात कोणताही समन्वय नसल्याने त्याचा फटका आम्हा विद्यार्थ्यांना बसत असल्याची खंत या विद्यार्थिनीने व्यक्त केली.
समोरून प्रवेश प्रक्रियेच्या तारखा निघून जात आहेत. आपण काही करू शकत नसल्याने या विद्यार्थिनीने आपणास आता याबाबत कोठे तक्रार करण्याचीही ताकद राहिली नसल्याचे सांगितले. गेल्या चार महिन्यात आपण कुलगुरू, परीक्षा विभाग प्रमुख, अन्य अधिकाऱ्यांना भेटले, उडवाउडवीची उत्तरे देण्यापलिकडे काहीही हाती लागले नाही, असे या विद्यार्थिनीने सांगितले. माझ्यासारखी अनेक विद्यार्थ्यांची अशीच परवड सुरू असल्याचे ही विद्यार्थिनी म्हणाली. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधला, पण प्रतिक्रिया मिळू शकली नाही.