वसई : बकरी बांधण्याच्या वादातून एका चिमुकल्याला जाळल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

नालासोपारा पूर्वेच्या संतोष भूवन येथील गावराई पाडय़ात इजहार कुरेशी तीन मुलांसमवेत राहतात. मोलमजुरी करणारे कुरेशी परिसरातील एका व्यक्तीच्या बकऱ्या आपल्या अंगणात बांधून सांभाळत होते. मात्र बकऱ्या बांधण्यावरून त्यांचा शेजारी राहणाऱ्या लोकांशी वाद होता. याच वादातून आलोक श्रीवास्तव आणि आकाश श्रीवास्तव यांनी घराबाहेर खेळत असलेला कुरेशी यांचा सात वर्षांचा मुलगा फैजान याला पेटवून दिले. त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात आणि नंतर नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान फैजानचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने दिलेल्या जबानीत आलोक आणि आकाश यांनी जिवंत जाळल्याचे सांगितले.

तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. बकरीच्या वादातून ही घटना घडल्याचे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी सांगितले.