ठाणे : भिवंडी येथील अन्सारी मैदान येथील मतदान केंद्रावर सोमवारी केंद्रीय मंत्री तथा भिवंडी लोकसभेचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी पोलीस आणि मतदार केंद्राबाहेरील नागरिकांना दमदाटी, शिवीगाळ केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समाजमाध्यमावर चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा – ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद

हेही वाचा – आनंद दिघे यांच्या बहिणीला पॅरालिटीक अटॅक, रुग्णालयात दाखल

अन्सारी मैदान परिसरातील एका शाळेमध्ये मतदान केंद्र होते. या केंद्रावर बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप कपिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर कपिल पाटील स्वत: या मतदान केंद्रावर आले. त्यांनी येथील बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी केली होती. तसेच मतदान केंद्राबाहेरील नागरिकांना देखील दमदाटी आणि शिवीगाळ केली. याप्रकरणाचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कपिल पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.