निसर्गामध्ये जिवांचं जगणं हे एकमेकांवर अवलंबून असतं. कधी ते एकमेकांना पूरक असतं तर अनेकदा मारक, भक्ष्य आणि भक्षक अशा संबंधांचं असतं. भक्षक भक्ष्याला मारून आपली भूक भागवतात. हे सर्व होत असताना भक्ष्यसुद्धा सहजासहजी भक्षकाच्या तावडीत सापडत नाही. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी निसर्गाने त्यांना विविध अस्त्रे दिली आहेत. कुणाचा आधार आणि ताकद प्रचंड असते. कुणी वेगाने पळतो तर कुणाला बचावासाठी शिंग आहेत.
फुलपाखरांकडे मात्र असे कोणतेही अवयव नसतात. त्यामुळे ते स्वरक्षण कसं करणार, हा प्रश्न असतो. मात्र, ही उणीव हा जीव स्वत:च भरून काढतो. काही फुलपाखरं विषारी वनस्पती खाऊन स्वत:ला विषारी बनवतात, तर काही आजूबाजूच्या निसर्गाच्या रंगात बेमालूम मिसळून जातात. यातलंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘ओक लीफ’ हे फुलपाखरू. पंख मिटून बसलेल्या या फुलपाखराच्या पंखांचा रंग आणि आकार एखाद्या वाळलेल्या पानासारखा भासतो. एखाद्या खऱ्याखुऱ्या पानासारखीच भासतात ही फुलपाखरे. यांच्या डोक्याकडील आणि शेपटाकडील भाग निमुळता होत गेलेला असतो. डोक्याकडील भागात तर पानाच्या देठासारखाच आकार असतो. शिवाय पंखांचे रंगदेखील मातकट, करडे किंवा बिस्किटासारखे तपकिरी असतात. भारतासारख्या ‘ट्रॉपिकल’ देशात गळून पडलेल्या पानांवर एक प्रकारची बुरशी जगत असते. त्यामुळे या पानांवर अतिशय सूक्ष्म ठिपके दिसतात. अगदी अशाच ठिपक्यांची नक्षी ‘ओक लीफ’ या फुलपाखरांवरही दिसून येते.
एकूणच निसर्गाशी अगदी एकरूप होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व बदल स्वत:मध्ये घडवून या फुलपाखरांनी स्वत:चे रक्षण केले आहे. या गुणधर्माला शास्त्रीय मिमिक्री असं म्हटलं जातं. अशा गुणधर्मामुळे हे फुलपाखरू आपल्या भक्षकापासून सहीसलामत वाचू शकतं.
पंख उघडल्यानंतर मात्र, या फुलपाखरांच्या पंखांवर निळ्या, नारिंगी रंगांच्या छटा दिसून येतात. हे रंग भडक असतात आणि पंखाच्या खालच्या बाजूच्या रंगांशी अगदीच विसंगत असतात. या फुलपाखरांमध्ये पावसाळी आणि उन्हाळी असे दोन प्रकारही आढळतात. पावसाळ्यात दिसणारे ‘ओक लीफ’ आकाराने लहान असते. तर उन्हाळी फुलपाखरू काहीसे मोठे किंवा मध्यम आकाराचे असते. एका वर्षांत या फुलपाखराच्या ३ ते ४ पिढय़ा जन्माला येतात.
भरपूर पाऊस असणाऱ्या आणि दाट झाडीच्या प्रदेशांत ही फुलपाखरे हमखास आढळतात. तसा यांचा वावर दक्षिण आशियात नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रात भीमाशंकरच्या जंगलात ‘ओक लीफ’ हमखात पाहायला मिळते.