पालघर जिल्ह्यातील आठ पंचायत समिती मधील सभापती व उपसभापती च्या निवडणुकीत आज झालेल्या निवडणुकीत पालघर, डहाणू, वाडा विक्रमगड व मोखाडा पाच ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने महा विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करण्यात आली आहे. तर जव्हार व वसई येथे शिवसेना व भाजपमध्ये अंतर्गत समझोता झाल्याचे दिसून आले असून तलासरी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निर्विवाद बहुमत असल्याने त्या पक्षाचा सभापती व उपसभापती निवड झाली आहे.

जिल्ह्यातील आठ पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. मात्र डहाणू व वसई तालुक्या व्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी निवड बिनविरोध झाल्या. पालघर, वाडा, वसई व मोखाडा या चार ठिकाणी शिवसेनेचे तर डहाणू व विक्रमगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभापती निवडून आले आहे. तलासरी मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १९६२ पासून सलग ५८ वर्ष लाल बावटा फडकावत ठेवला असून जव्हार येथे जिल्ह्यात एकमेव ठिकाणी भाजपाचा सभापती निवडून आला आहे. मोखाडा येथे सारिका निकम या सलग तिसऱ्यांदा सभापती पदी निवडून आल्या आहेत.

तालुकानिहाय निवडणूक निकाल: सभापती / उपसभापती
पालघर- रंजना म्हसकर (शिवसेना)/ चेतन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
डहाणू- स्नेहलता सातवी (राष्ट्रवादी काँग्रेस)/ पिंटू गहला (शिवसेना)
वाडा- योगेश गवा (शिवसेना)/ जगदीश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
विक्रमगड- सुचिता कोरडा (राष्ट्रवादी काँग्रेस)/ नम्रता गोवारी (शिवसेना)
मोखाडा- सारिका निकम (शिवसेना)/ लक्ष्मी भुसारा (राष्ट्रवादी काँग्रेस)
जव्हार- सुरेश कोरडा (भाजपा)/ चंद्रकांत रंधा (शिवसेना)
वसई- अनुजा पाटील (शिवसेना)/ वनिता तांडेल (भाजपा)
तलासरी- कॉ. नंदकुमार हाडळ / कॉ. राजेश खरपडे (दोघी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)