ठाणे : कापुरबावडी येथील सी. पी. गोएंका शाळेसमोर पालकांनी शाळा व्यवस्थापनाला बदलण्याची मागणी करत पालकांनी सुमारे नऊ तास ठिय्या मांडला. काही पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही. अनेक पालक उपाशीपोटी आंदोलन करत होते. न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा निर्णय पालकांनी घेतला होता. पालकांचे शिष्टमंडळ आणि शाळेच्या विश्वस्त मंडळाची दुपारी उशिरापर्यंत बैठक सुरू होती. त्यानंतर शाळा प्रशासनाने आणखी तीन जणांना निलंबित केले.

कापुरबावडी भागात ‘सी. पी. गोएंका इंटरनॅशनल स्कूल’ या शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची मंगळवारी घाटकोपर येथील एका थीम पार्कमध्ये सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ हजार ६०० रुपये घेण्यात आले होते. एका खासगी कंपनीच्या बसगाड्यांमधून विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेले जात होते. मंगळवारी एकूण चार बसगाड्या या सहलीसाठी निघाल्या. या बसगाडीपैकी एका बसगाडीत जावेद खान हा सेवक (अटेन्डन्ट) म्हणून होता. बसगाडीमध्ये खाद्य पदार्थाची पाकिटे वाटत असताना, जावेद याने काही मुला-मुलींचा विनयभंग केला. बसगाडीमधून उतरल्यानंतर एका मुलीने तिच्या पालकांना याप्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर आणखी सात ते आठ मुला-मुलींसोबत असा प्रकार घडल्याचे समोर आले. याप्रकरणी पालकांनी रात्री उशिरा याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार, कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी जावेद खान याला अटक केली होती. तर बसगाड्यांमधील तीन शिक्षकांना निलंबित केले होते. मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपने पालकांच्या बाजूने भूमिका घेत शाळा प्रशासनावर टीका केली. तसेच भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी देखील कापूरबावडी पोलिसांना शाळा प्रशासनाविरोधात निवेदन दिले.

हेही वाचा – विद्यार्थी विनयभंग प्रकरण : भाजपचे पदाधिकारी गोएंका शाळेत शिरताच पालकांचा विरोध

गुरुवारी सकाळी अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठविले नाही. तसेच सकाळी ७.३० वाजेपासून पालकांनी शाळेबाहेर जमण्यास सुरुवात केली. त्यानंतर मनसे, भाजपचे पदाधिकारी देखील शाळेबाहेर जमले. घटनेविरोधात पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली. तसेच व्यवस्थापन मंडळाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर शाळेतील विश्वस्त मंडळ आणि पालकांच्या शिष्टमंडळाची एक बैठक पार पडली. दुपारी ३ वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. पालक देखील शाळेबाहेर ठाण मांडून होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास आमदार संजय केळकर हे देखील शाळेत आले. त्यांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले. अखेर शाळेच्या विश्वस्तांनी शाळेच्या आणखी तीन जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित केले. त्यानंतर पालकांनी त्यांचे आभार मानले.

हेही वाचा – ठाणे : सुट्ट्यांच्या दिवसांत वातानुकूलीत रेल्वेगाड्यांच्या सेवा रद्द होत असल्याने प्रवासी हैराण

सी.पी. गोएंका शाळेत भाजपचे आमदार संजय केळकर हे त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांसह शाळेमध्ये शिरले. परंतु पदाधिकाऱ्यांना शाळेबाहेर काढा अशी मागणी पालकांच्या एका गटाने केली. त्यामुळे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना शाळेबाहेर पडावे लागले. दुपारी उशिरापर्यंत पालकांचा शाळेबाहेरील ठिय्या कायम होता.