भाईंदरमध्ये शेकडो लिटर पाणी वाया

बसने धडक दिल्याने मीरा-भाईंदर महापालिकेच्या जलवाहिनीवर बसविण्यात आलेला व्हॉल्व्ह फुटून शेकडो लिटर पाणी वाया गेले. मात्र दोन तासांच्या प्रयत्नांनंतर व्हॉल्व्ह बदलण्यात प्रशासनाला यश आल्याने शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. या प्रकाराचा पाणीपुरवठय़ावर फारसा परिणाम होणार नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

मीरा-भाईंदरला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या ५०० मीमी व्यासाच्या जलवाहिनीला बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गोल्डन नेस्ट ते काशिमीरा या मुख्य रस्त्यावरील शिवार गार्डन येथे एका बसने धडक दिली. ही धडक जलवाहिनीवर बसविण्यात आलेल्या व्हॉल्व्हलाच बसल्याने व्हॉल्व्ह तुटून मोठय़ा प्रमाणावर पाणी वाया गेले.  पाण्याला दाब असल्याने कारंज्यासारखे फवारे उडून पाणी रस्त्यावर साठले. यामुळे काही काळ वाहतूक कोंडीदेखील झाली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर तुटलेला व्हॉल्व्ह बदलण्यात प्रशासनाला यश आले. या वेळी शेकडो लिटर पाणी वाया गेले असले तरी वाया गेलेल्या पाण्याची तूट भरून काढून नागरिकांच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होऊ दिला जाणार नाही असा दावा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी केला आहे.