ठाणे पट्टय़ात कुठेही सोनसाखळी चोरी किंवा घरफोडी झाली की पोलिसांची पावले ज्या वस्तीकडे वळायची, त्याच वस्तीत आता पोलिसांच्या आगमनाची प्रतीक्षा केली जात आहे. भुरटे, सोनसाखळी चोर यांच्या वास्तव्यामुळे कलंकित झालेल्या भिवंडीतील इराणी वस्तीतील तरुणांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे ठाणे पोलिसांचे प्रयत्न आता फळ देऊ लागले आहेत. पोलिसांच्या समुपदेशनामुळे या वस्तीतील बारा शाळाबाहय़ मुले पुन्हा शाळेच्या मार्गाला लागली आहेत, तर याच वस्तीतील एका युवतीला उच्च शिक्षणासाठी पोलिसांनीच आर्थिक मदत मिळवून दिली.

ठाणे आणि आसपासच्या शहरांत वाढत असलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांचे मूळ कल्याण, भिवंडी येथील इराणी वस्तीत असल्याचे पोलिसांना वारंवार आढळले होते, मात्र या वस्तीतील रहिवाशांचा प्रतिकार आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्याच्या भीतीने तेथे आजवर ठोस कारवाई झाली नव्हती. एका प्रकारे ही वस्ती कलंकित म्हणून ओळखली जात होती; परंतु परमबीर सिंग यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच इराणी वस्तींमधील चोरटय़ांच्या अड्डय़ांवर धडक कारवाई सुरू केली. त्याच वेळी काही चोरटोळय़ांमुळे बदनाम होत असलेल्या इराणी वस्तीतील मुले आणि तरुणांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नही  सुरू केले. भिवंडी शहरातील इमामपाडा, पिराणीपाडा, खान कंपाऊंड आणि जब्बार कंपाऊंड या भागांत इराणी वस्त्या आहेत. या वस्त्यांमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे इराणी राहतात. मात्र, गुन्हेगारी पाश्र्वभूमी व पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी यातील अनेक कुटुंबे वारंवार स्थलांतर करतात. याचा परिणाम कुटुंबातील मुलामुलींच्या शिक्षणावर होत होता. ही मुले पुढे गुन्हेगारीकडे वळत असल्याचा अनुभव आहे. या पाश्र्वभूमीवर पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलिसांनी वस्त्यांमध्ये जाऊन समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे.

भिवंडी पोलिसांच्या समुपदेशन मोहिमेनंतर तीन पालक पुढे आले असून त्यांनी मुलांना शाळेत पाठविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार भिवंडीतील सल्लाउद्दीन हायस्कूलच्या प्रशासनाशी पोलिसांनी संपर्क साधून झैनब जाफरी याला इयत्ता नववीत, तर साहिल जाफरी याला इयत्ता दुसरीत प्रवेश मिळवून दिला आहे. तसेच मोहमद रजा रहेमत जाफरी याला इयत्ता आठवीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला.

मोहम्मद रजाने पोलीस दलात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे अन्य दहा मुलांच्याही शाळा प्रवेशासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

‘कंपनीत मोठय़ा पदावर पोहोचायचंय’

या वस्तीत राहणारी नगमा शिराजी जाफरी या पदवीधर तरुणीची व्यथा तर आणखी वेगळी आहे. नगमाचे वडील अभियंते आहेत. मात्र इराणी वस्तीत राहात असल्याने, किंबहुना इराणी असल्यामुळे त्यांना कोठेही नोकरी मिळाली नाही. वडिलांच्या निष्पाप माथी लागलेला हा कलंक नगमाच्या उच्च शिक्षणात आडवा येत होता. कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी नगमाकडे पाच हजार रुपये नव्हते, मात्र पोलीस आणि एका सामाजिक संस्थेने तिच्या शिक्षणाचा खर्च उचलला. त्यामुळे नगमाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आता आपणच पुढे एका मोठय़ा कंपनीची वरिष्ठ अधिकारी बनू, असा निर्धार तिने व्यक्त केला आहे.