मांडा-टिटवाळा परिसरातील बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना, पादचाऱ्यांना या रस्त्यांवरून ये-जा करताना कसरत करावी लागते. पालिकेने गणपतीपूर्वी हे रस्ते सुस्थितीत करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

कल्याण ते शहाड, निमकर नाका, सावरकरनगर ते नाईक ऑटो रस्त्यांवर जागोजागी खड्डे आहेत. या रस्त्यांवरून येण्यास रिक्षाचालक तयार होत नसल्याने प्रवाशांना पायी प्रवास अन्यथा पर्यायी रस्त्याचा अवलंब करून घर गाठावे लागते. मातादी मंदिर ते बल्याणी-आंबिवली-शहाड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हरिओम व्हॅली, नांदप रस्ता, स्मशानभूमी रस्ता, सांगोडा रस्ता या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

टिटवाळा परिसरातील गावांमध्ये भाजीपाला, दूध व्यवसाय करणाऱ्या शेतक ऱ्यांची संख्या अधिक आहे. ही मंडळी दुचाकी, रिक्षेतून साहित्य घेऊन येतात. त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शाळेतील विद्यार्थी रस्त्याने जात असताना अनेक वेळा वाहनाने खड्डय़ातील पाणी अंगावर उडून गणवेश खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. सावरकर चौक ते निमकर नाका रस्ता अनेक वर्षे रखडला आहे. तो पूर्ण करण्यात येत नसल्याने रहिवासी, वाहन चालकांची कुचंबणा होत आहे.