सरकारच्या प्रयत्नांपूर्वीच उपक्रम सुरू; लातूर एक्सप्रेसचा आधार
कर्जत स्थानकावर गेल्या एक महिन्यापासून रात्री साडेदहाच्या सुमारास रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी पाहायला मिळते. रात्री १० वाजून ४० मिनिटांनी लातूरला जाण्यासाठी लातूर एक्स्प्रेस कर्जत स्थानकावर पोहोचते. लागलीच मोठय़ा प्रमाणावर तरुण आणि कर्जतकर नागरिक माल डब्ब्याकडे धाव घेतात आणि त्यात मोठे पाण्याचे कॅन, बाटल्यांचे बॉक्स आणि मोठय़ा प्लास्टिकच्या बाटल्या डब्ब्यात टाकण्यासाठी एकच धावपळ करतात आणि हे सर्व पाणी लातूरच्या नागरिकांसाठी पाठवले जाते. कर्जतकरांचे हे दातृत्व सरकारी प्रयत्नांच्या आधीपासून सुरू झाले आहे, हे विशेष.
लातूरमधील पाणीटंचाईचे भीषण वास्तव समोर आल्यानंतर लातूरसाठी पाणी देण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. सध्या लातूरकरांसाठी मिरजेहून रेल्वेद्वारे पाणी दिले जाते आहे. मात्र सरकारने रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्याआधीपासूनच कर्जतमधील काही संवेदनशील नागरिकांनी लातूरला लातूर एक्स्प्रेसच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्याची सुरुवातही केली आहे. कर्जतमधील हॉटेल व्यावसायिक टी मोहनराज यांना सततच्या पाणीटंचाईच्या बातम्या त्रास देऊ लागल्या. त्यातून त्यांनी स्वत:च्या हॉटेलमधील पाणी मोठय़ा कॅनमध्ये भरून एका राजकीय पक्षाच्या साहाय्याने लातूर एक्स्प्रेसमध्ये टाकण्यास सुरुवात केली. मात्र एक दिवस निघाला, पुढचे काय हा प्रश्न त्यांना सतावू लागला. त्यावेळी त्यांना रेल्वेचे साहाय्य लाभले. रिकाम्या मालडब्ब्यात त्यांच्या या पाण्याच्या बाटल्या पडू लागल्या. कर्जतकरांना याची माहिती मिळाली. मग हळूहळू रमाकांत जाधव, राजेश कलराज यांच्या सारख्यांचीही साथ त्यांना मिळाली. त्यातून आज दररोज ८ ते १० हजार लिटर पिण्याचे पाणी लातूरसाठी रवाना केले जाते. लातुरात काही स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब यांच्या माध्यमातून या पाण्याचे वाटप अत्यावश्यक ठिकाणी केले जाते. त्यामुळे त्याचा योग्य विनियोग होतो आहे. स्वत: टी मोहनराज आणि स्मिता मामोनकर हे लातूरला भेट देऊन याची खात्री करत असतात.