लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच कल्याण पू्र्व, पश्चिम भागात मंगळवार पासून विजेचा लपंडाव सुरू आहे. बुधवारी पहाटे तीन वाजता कल्याण पूर्व भागाचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. विजेच्या सततच्या लपंडावामुळे कल्याण मधील नागरिक दोन दिवस हैराण आहेत.

कल्याण परिसरातील तापमानाचा पारा मागील तीन दिवसांपासून ४२ अंशच्या पुढे गेला आहे. घरात पंख्याखाली असूनही नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण आहेत. अशा परिस्थितीत कल्याण पश्चिमेत मंगळवारी दुपारपासून चिकणघर, रामबाग, खडकपाडा भागात विजेचा लपंडाव सुरू होता. रात्रीच्या वेळेत दुर्गाडी किल्ला भाग, खडकपाडा भागात वीज पुरवठा बंद झाला होता.

आणखी वाचा-मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल

बुधवारी कल्याण पूर्व भागाचा वीज पुरवठा पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान बंद झाला होता. अगोदरच अंगाची काहिली होत असताना त्यात वीज गेल्याने नागरिक हैराण झाले होते. अनेक नागरिक पहाटे, रात्री घराबाहेरील मोकळ्या जागेत उकाड्याची काहिली शमविण्यासाठी बसले होते. घरातील लहान मुले, बालके वीज पुरवठा बंद झाल्याने अस्वस्थ होती. घरात बिछान्याला खिळून असलेले, उपचार घेत असलेले विविध प्रकारचे रुग्ण उकाड्याने हैराण झाले होते.

वीज पुरवठा बंद असल्याने घराचे दरवाजे, खिडक्या मोकळ्या हवेसाठी उघड्या ठेवल्या तर घरात डासांचा उपद्रव होईल या भीतीने कोणीही नागरिक दरवाजे, खिडक्यांची फडताळे उघडण्यास तयार नव्हता. कडक उन्हाळा सुरू होताच विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत होते. वीज पुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात सतत संपर्क करणे चालू ठेवल्याने महावितरणचा सेवा संपर्क क्रमांक दोन ते तीन तास व्यस्त येत होता.

आणखी वाचा-ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प

नागरिकांच्या वाढत्या तक्रारी विचारात घेऊन महावितरणचे कर्मचारी रात्रीतून खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी रात्रीच बाहेर पडले होते. या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे टप्प्याने कल्याण पूर्व, पश्चिमेचा वीज पुरवठा टप्प्याने पूर्ववत झाला. त्यानंतर नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला. प्रमाणापेक्षा विजेची मागणी वाढल्याने असे प्रकार घडतात. किंवा तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा बंद होतो, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power supply of kalyan east was suddenly interrupted in early morning mrj