*गैरवापराच्या भीतीने अनेक शाळांचा निर्णय; 

*टॅब’वाटपाद्वारे दप्तर हलके करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न अपयशी

शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाचा समावेश असलेल्या टॅबचे वाटप करण्याची योजना अपयशी ठरण्याची चिन्हे आहेत. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने मोठा गाजावाजा करत पालिका निवडणुकीपूर्वी शालेय विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप केले. मात्र विद्यार्थ्यांकडून या टॅबचा दुरुपयोग होऊ लागल्याचे दिसून आल्याने काही शाळांनी हा टॅब शाळेत आणण्यावर बंदी आणली आहे. शिवाय अनेक ठिकाणी शिक्षकच टॅबबाबत प्रशिक्षित नसल्याने त्यांनाच प्रशिक्षित करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कायम आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने विद्यार्थ्यांना शिकवण्यात अधिक सुलभता यावी, यासाठी शालेय विद्यार्थ्यांना टॅबवाटप करण्याची योजना मांडली गेली. पुढे या योजनेचे राजकारण करत देशभरात विविध राजकीय पक्षांनी आपल्या वचननाम्यांमध्ये, प्रचारामध्ये विद्यार्थ्यांना टॅब वाटण्याच्या घोषणा केल्या. मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने प्रथम हा प्रयोग राबवला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतर्फे शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.

परंतु या टॅबमध्ये शालेय अभ्यासक्रमाचा समावेश असला तरी विद्यार्थ्यांना शाळेत वह्या आणाव्याच लागत आहेत. अनेक शाळांमध्ये शिक्षकांनाच टॅबच्या हाताळणीचे योग्य ज्ञान नसल्याने विद्यार्थ्यांना शिकवण्यात अडचणी येत आहेत. त्यातच विद्यार्थ्यांकडून या टॅबचा वापर गेम खेळणे, सिनेमे पाहणे आदी अवांतर गोष्टींसाठीच अधिक होऊ लागल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांनी टॅबमध्ये सिमकार्ड टाकून ते कार्यान्वित केल्याचे उघड झाले आहे. या माध्यमातून वर्गातल्या वर्गात एकमेकांना व्हॉट्सअ‍ॅपवरून संदेश पाठवणे, फोटो काढणे, व्हिडीओ काढणे असे प्रकार केले जात असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी केल्या आहेत. ‘आता तर वर्गात आल्यानंतर पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांचे टॅब तपासून त्यावर काही अनुचित प्रकार होत नाही ना, हे तपासावे लागते,’ अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने दिली. ‘मुळात मुलांना टॅबवाटप करताना ब्ल्यू टूथ, वायफाय व इंटरनेट सेवा नसावी. त्यात केवळ अभ्यासक्रम अपलोड केलेला असावा असे सुचविले होते; परंतु कंपनीने या सेवा बंद केल्या नाहीत,’ असे या शिक्षकाने सांगितले. अनेक शाळांना असा अनुभव आल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत टॅब आणण्यावरच बंदी घातली आहे.