विरार स्थानकात उभ्या ‘मेमू’तील पंखे, दिवे बंद करण्याकडे कटाक्ष

‘रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती आहे’ असे वाक्य आपल्याला रेल्वेस्थानके आणि गाडय़ांमध्ये नेहमी ऐकायला मिळते. परंतु, ‘राष्ट्रीय संपत्ती’ म्हणजे ‘आपलीच संपत्ती’ असा अर्थ काढून अनेक प्रवासी रेल्वेच्या मालमत्तेचा कसाही वापर, गैरवापर करतात. कोठेही थुंकणे, डब्यांचे विद्रूपीकरण करणे, आसने फाडणे असे प्रकार नेहमीच घडत असतात. मात्र, विरार स्थानकात एका ६५ वर्षीय आजींनी आपल्या दैनंदिनी कृतीतून रेल्वेप्रवाशांसमोर एक आदर्श उदाहरण घालून दिले आहेत. विरार स्थानकात दररोज सायंकाळी उभ्या राहणाऱ्या विरार-डहाणू लोकलमधील सर्व डब्यांमध्ये जाऊन या आजी पंख्यांची बटणे बंद करतात. रेल्वेची वीजबचत करणाऱ्या या आजींबद्दल फारशी कुणाला माहिती नाही. शहाआजी म्हणून त्यांना सगळे ओळखतात.

विरार रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ एवर रोज संध्याकाळी ६ वाजता डहाणू-विरार मेमू थांबते. ही गाडी रात्री साडेआठ वाजता सुटते. त्याचप्रमाणे फलाट क्रमांक ४ एवर विरार-डहाणू शटल रात्री साडेआठ वाजता येऊन थांबते. ती सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी रवाना होते. या दोन्ही गाडय़ा फलाटावरच उभ्या असतात. पण त्यातील पंखे, दिवे सुरूच असतात. शहा आजी दररोज सायंकाळी या फलाटांवर जातात व गाडीतील प्रत्येक डब्यात शिरून पंखे आणि दिवे बंद करतात.

गेल्या काही वर्षांपासून शहा आजींचा हा उपक्रम सुरू आहे. स्थानकातून दररोज ये-जा करणारी मंडळी, विक्रेते आजींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. परंतु, शहा आजी कुणाशीही बोलत नाहीत किंवा पंखे बंद न करता उतरलेल्या प्रवाशांना उपदेशही देत बसत नाहीत. त्या नित्यनेमाने आपले वीजबचतीचे काम जणू कर्तव्य असल्याप्रमाणे पार पाडतात आणि निघून जातात. त्यांना याबद्दल खोदून खोदून विचारल्यावर त्या एवढय़ाच म्हणाल्या, ‘रेल्वे आपली संपत्ती आहे. तिच्या विजेची बचत आपण करायला हवी.’‘आम्हाला दररोज आजी स्थानकात दिसते. तिच्या हातात एक पिशवी असते. त्यात पाण्याची बाटली असते. ती नियमितपणे रेल्वेतील पंखे बंद करते आणि आपल्या मार्गाने परत जाते, असे प्रवाशांनी सांगितले.