ग्रंथवाचन हे महापुरुषांशी संवाद साधण्यासारखे आहे. ग्रंथाच्या सहवासात राहून जशी काही माणसे मोठी झाली, तसेच काही प्रसिद्ध व्यक्तींमुळे ग्रंथालयेही नावारूपाला आली आहेत. ग्रंथामुळेच भाषा, समाज, संस्कृती समृद्ध होते, असे मत प्रवचनकार यशवंत कानडे यांनी व्यक्त केले.
४६ व्या ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या अधिवेशनात भिवंडी येथील ‘वाचन मंदिर’ या संस्थेला ग्रंथमित्र ना. गो. जाधव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर रा. स. ठाकूर गुरूजी आदर्श ग्रंथपाल पुरस्कार वाशी येथील फिरोजशहा फाऊंडेशन ग्रंथालयाच्या ग्रंथपाल शीला चौधरी यांना प्रदान करण्यात आला.
ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे ४६वे अधिवेशन भिंवडी येथील ब्राह्मण आळीतील गणपती मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महापौर तुषार चौधरी, आमदार रुपेश म्हात्रे, आमदार महेश चौघुले उपस्थित होते कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेंद्र वैती, ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विनायक गोखले, वाचन मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुधीर सिंगसणे, कोकण विभागाचे निरीक्षक व प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक मनोज सोनगे यावेळी उपस्थित होते. अधिवेशनाचे अध्यक्ष यशवंत कानडे यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. ‘यंत्रनगरी’ या विशेषांकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले, तसेच नेटसेट स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वळ गावतील शिक्षक संतोष सोनावणे व त्यांच्या पत्नी सुप्रभा सोनावणे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रंथालय क्षेत्रात सतत ५० वर्ष सेवा करणारे शरद मराठे यांचा हृद्य सत्कार यावेळी ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी १६० हून अधिक ग्रंथालय कार्यकर्ते उपस्थित होते.