ठाणे : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वाळू माफियांकडून अवैधरीत्या नदी पात्रातून आणि खाडीतून मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र याच खाडी आणि नदीपात्राबरोबरच वाळू माफियांकडून कल्याण आणि दिवा येथील खाडीतील रेल्वे पुलांच्या तळाशी मोठय़ा प्रमाणात वाळू चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा पद्धतीने सुरू असलेल्या अवैध उपशामुळे हळूहळू रेल्वे पूल कमकुवत होत असून भविष्यात मोठय़ा दुर्घटनेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील खाडी आणि नदी पात्रातून मोठय़ा प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा सुरू आहे. या वाळू माफियांवर जिल्हा महसूल विभागातर्फे वेळोवेळी कारवाईदेखील करण्यात येते. मात्र, असे असले तरीही प्रशासनाचा डोळा चुकवून वाळू माफियांकडून सर्वत्र अवैध वाळू उपसा सुरूच आहे. मागील काही दिवसांत वाळू माफियांनी खाडीतून जाणाऱ्या रेल्वे पुलाच्या खांबांच्या तळाशीच वाळू उपसा सुरू केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनामध्ये यासंबंधी काही दिवसांपूर्वी बैठक झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी सुरक्षिततेचे उपाय राबविण्याबाबत रेल्वे प्रशासनाला सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या संथ कारभारामुळे आणि रेल्वे पुलाच्या तळाशी सुरू असलेल्या वाळू उपशाने पूल कमकुवत होऊन भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच पाश्र्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे मान्सूनपूर्व कामांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत.
भरती-ओहोटीचे नियोजन करत वाळू चोरी
जिल्ह्यातील खाडीत असणाऱ्या रेल्वे पुलांच्या तळाशी वाळू माफियांकडून प्रामुख्याने भरतीच्या वेळी चोरी केली जाते. पुलांच्या नजीक असणाऱ्या दलदलीच्या भागातून या माफियांकडून खाडीत बोटी उतरविण्यात येतात. त्यानंतर ओहोटीच्या आधी हे माफिया पसार होतात. हे सर्व प्रकार जीवघेणे असल्याने शासकीय यंत्रणांना तिथे जाणे शक्य होत नाही. अशा भागांमध्ये संरक्षक भिंत किंवा मोठाले लोखंडी गज टाकण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातर्फे रेल्वे प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनातर्फे वाळू माफियांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. रेल्वे पुलाजवळ सुरू असलेला वाळू उपसा थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासनाला काही सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र ‘रेल्वे’ कडून अद्याप कार्यवाही झाली नसल्याने त्यांनी तातडीने यासंबंधी पावले उचलणे महत्त्वाचे आहे. – राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे