लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथः अंबरनाथ शहरातील कल्याण बदलापूर राज्यमार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून आता सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. काटई बदलापूर राज्यमार्गावरील अंबरनाथ शहरात प्रवेश करताना पहिल्या मटका चौकात, पूर्वेतील महात्मा गांधी शाळा आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ आणि फॉरेस्ट नाका येथे ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागून वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळण्याची आशा आहे.

अंबरना एक औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शहरातील वाहनांची संख्या मोठी आहे. अंबरनाथ शहरातून सर्वाधिक वर्दळीचे असे काटई बदलापूर आणि कल्याण बदलापूर दोन राज्यमार्ग जातात. या राज्यमार्गांवरून शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक राज्यमार्गावरच्या पहिल्याच चौकात मोठी कोंडी होते. काटई कर्जत राज्यमार्गावर आनंद नगर येथे, कल्याण बदलापूर राज्यमार्गावर फॉरेस्ट नाका आणि मटका चौकात कोंडी होते. वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसल्याने येथे मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. त्यात बेशिस्त वाहनचालक या कोंडीत भर घालतात.

आणखी वाचा-ठाणे : दिवा स्थानकातून सीएसएमटी गाड्या सोडा, प्रवासी संघटनेची स्वाक्षरी मोहीम

चारही बाजुने येणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा वाहन चालकांत खटकेही उडतात आणि परिणामी कोंडी वाढत जाते. त्यामुळे येथे वाहतूक व्यवस्थापन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेने या तीन चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला होता. यात सुरूवातीला शहरातील तीन चौकांमध्ये ही यंत्रणा उभारण्याची पालिकेने तयारी केली. त्यानुसार जून महिन्यात यासाठी निविदा जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने ८३ लाख २१ हजार ८१५ रूपयांची निविदा जाहीर केली होती. हे काम अखेर पूर्ण झाले असून कल्याण बदलापूर राज्यमार्गावरील मटका चौक, महात्मा गांधी शाळेचा चौक आणि फॉरेस्ट नाका येथे सिग्नल यंत्रणा सज्ज झाली आहे. येत्या काही दिवसात ही यंत्रणा सुरू होणार आहे. त्यामुळे येथील वाहतुक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या काळात वाहनचालकांना या सिग्नल यंत्रणेची सवय होईपर्यंत वाहतूक पोलिसांपुढे वाहतूक व्यवस्थापनाचे मोठे आव्हान आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Signals at three places on kalyan badlapur state highway mrj