कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, नवी मुंबई या शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या उल्हास नदीचे पाणी कल्याण खाडीत येऊन मिळते. कल्याणजवळ खाडी असली तरी तिला ‘उल्हास खाडी’ असे म्हटले जाते; मात्र प्रदूषणामुळे ही खाडी ‘डेड झोन’ झाली आहे. या बाबीला प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक विकास महामंडळ जबाबदार आहे, ही बाब वनशक्ती या पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थेच्या उल्हास नदी बचाव प्रकल्प अभ्यासातून सामोर आली आहे.
पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या वनशक्ती या संस्थेने २०११ पासून उल्हास नदी बचाव प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. अभ्यास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अश्विन अघोर यांनी डिसेंबर २०१२ पासून उल्हास खाडीला जाऊन मिळणाऱ्या प्रदूषित नाल्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले. यात प्रामुख्याने प्रदूषणासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधून वाहणाऱ्या नाल्यांचे नमुने अभ्यासासाठी गोळा केले. शहरांलगत वाहणारी उल्हास नदी प्रदूषणामुळे गटारगंगा झाली आहे. डोंबिवलीतील प्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाची डोळेझाक होत आहे. याशिवाय कारखान्यातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र डोंबिवली औद्योगिक वसाहतीमध्ये आहेत. या दोन्ही सांडपाणी प्रक्रिया केंद्रांत योग्य प्रकारे प्रक्रिया होत नसल्याचे अभ्यासातून उघड झाले आहे. मार्च २०१६च्या सुनावणी दरम्यान केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सादर झालेल्या प्रतिज्ञापत्रावरून ही बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

सीओडीचे प्रमाण अधिक
रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया करून जे पाणी नाल्यात सोडले जाते, त्यात सीओडी केमिकल ऑक्सिजन डिमांडचे प्रमाण प्रतिलिटर २५० मिलिग्रॅम असणे आवश्यक आहे. मात्र सर्वेक्षणासाठी गोळा करण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यात सीओडीचे प्रमाण प्रतिलिटरमागे दोन हजार मिलिग्रॅम असे आढळले होते. त्यापैकी काही नमुन्यात तर सीओडीचे प्रमाण प्रतिलिटरमागे ४००० मिलिग्रॅमपेक्षाही जास्त होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेऊन संबंधितांच्या विरोधात कारवाई करणे अपेक्षित असतानाही, त्यांच्याकडून कारवाही होत नाही. त्यामुळे वनशक्ती संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली होती. तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळालाही लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर उल्हास नदीच्या आसपासच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर दंडात्मक कारवाही करण्यात आली होती.

प्रदूषणाविषयी नागरिकांच्याही तक्रारी
वनशक्तीने उल्हास बचवासाठी मोहीम सुरू केली असली तरी, त्यापूर्वीही येथील प्रदूषणाविषयी अनेक तक्रारी राज्य प्रदूषण मंडळाकडे आल्या होत्या. त्यामध्ये डॉ. नाफडे यांनी दिलेली तक्रार उल्लेखनीय आहे. डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रातून सोडण्यात येणारे सांडपाणी शहरातील नाल्यातून उल्हास नदीला मिळते. त्या प्रदूषणाची तीव्रता जास्त असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये कर्करोगासारखे दुर्घर आजार उद्भवले आहेत.