पालघर जिल्ह्यत २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून २०१५ मध्ये एकूण ३६२ जण बेपत्ता झाले होते. त्यात २२७ तरुण मुली आणि महिला होत्या. त्यापैकी १४ ते १८ वर्षे वयोगटातील १४२ मुलींचा समावेश होता. त्यातील २०३ जणींचा शोध लागला तर अद्याप २४ मुलींचा शोध लागलेला नाही. त्याचप्रमाणे १३५ मुले आणि पुरुष बेपत्ता होते. त्यात ३९ अल्वपवयीन मुलांचा समावेश होता.

शहरातील अनेक समस्यांबद्दल चर्चा होत असताना एका गंभीर सामाजिक प्रश्नाकडे फारसे कुणाचे लक्ष नाही. ही समस्या आहे बेपत्ता होणाऱ्या मुलांची. वसई-विरार किंबहुना संपूर्ण पालघर जिल्ह्यात हा गहन प्रश्न निर्माण झालेला आहे. अल्पवयीन मुले आणि मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. दररोज प्रत्येक पोलीस ठाण्यात बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींची किमान एक तरी तक्रार दाखल होत असते. मागील दोन वर्षांत पालघर जिल्ह्यांतून ६५९ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाली होती. त्यापैकी ५७९ जणांचा शोध लागला असून अद्याप ८० जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या ८० जणांमध्ये ५५ अल्पवयीन मुली आणि २५ मुलांचा समावेश आहे. वयात आलेली पण अल्पवयीन मुले-मुली घर सोडून पळून जात आहे. बहुतांश प्रकरणात मुली प्रियकरासोबत पळून जात आहेत, तर मुले आई-वडिलांशी क्षुल्लक कारणांवरून भांडून घर सोडून जात आहेत. प्रेमाच्या आकर्षणाला भुलून ही मुले-मुली घर सोडून जातात. काही दिवसांनी ती परततात तेव्हा मात्र उद्ध्वस्त झालेली असतात. बेपत्ता मुलांचा शोध घेणे हे पोलिसांचे काम असले तरी मुळात मुले अशी पावले का उचलतात त्याचा समूळ विचार करून ते रोखणे गरजेचे आहे.

पालघर जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मुले आणि मुली बेपत्ता होत असतात. २०१५ मध्ये एकूण ३६२ जण बेपत्ता झाले होते आणि त्यांचे अपहरण झाले होते. त्यात २२७ तरुण मुली आणि महिला होत्या. त्यापैकी १४ ते १८ वर्षे वयोगटातील १४२ मुलींचा समावेश होता. त्यातील २०३ जणींचा शोध लागला तर अद्याप २४ मुलींचा शोध लागलेला नाही. त्याचप्रमाणे १३५ मुले आणि पुरुष बेपत्ता होते. त्यात ३९ अल्वपवयीन मुलांचा समावेश होता. बेपत्ता १३५ जणांपैकी १२२ जणांचा शोध लागला असून अद्याप १३ अल्पवयीन मुलांचा शोध लागलेला नाही. २०१५ या वर्षांत मुले आणि मुली मिळून अद्याप ३७ जण बेपत्ता आहेत. २०१६ या वर्षांत २९७ जण बेपत्ता झाले होते आणि त्यांचे अपहरण झाले होते. त्यात १८९ तरुण मुली आणि महिला होत्या. त्यापैकी १४ ते १८ वष्रे वयोगटातील १४४ अल्पवयीन मुलींचा समावेश होता. यातील १५८ मुली सापडल्या तर अद्याप ३१ मुलींचा शोध लागलेला नाही. याच वर्षांत १०८ तरुण आणि ३१ अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी ९६ जण सापडले असून अद्याप १२ अल्पवयीन मुलांचा शोध लागलेला नाही. २०१५ या वर्षांतील ३७ आणि २०१६ या वर्षांतील ४३ असे मिळून एकूण ८० मुला-मुलींचा शोध लागलेला नाही. ती कुठे गेली, कुणी त्यांचे अपहरण केले, ते जिवंत आहेत का मयत आहेत, या प्रश्नांचे गूढ कायम आहे. त्यांच्या शोधासाठी पालक पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहेत. या मुलांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

अल्पवयीन मुले-मुली घर सोडून पळून जातात, त्यांना फूस लावली जाते ही बाब गंभीर आहेच, परंतु या प्रश्नाची उकल करायची असेल तर त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. बदलत्या जीवनशैलीने मुले लवकर वयात येतात. मुलींना पाळीही आता कमी वयात येऊ  लागली आहे. त्यामुळे शारीरिक नैसर्गिक भावना या कमी वयातच निर्माण होत असतात. आई-वडील हे कामानिमित्त घराबाहेर असतात. मुलांच्या हातात मोबाइल नावाचे अस्त्र दिले जाते. पण वायफायमुळे ही मुले सतत इंटरनेटच्या मोहजालात असतात. त्यातून फसवे मायाजाल त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. आकर्षणाला प्रेम मानून बसतात. प्रसारमाध्यमे, उपग्रहवाहिन्या, सिनेमे यांनीही खुले वातावरण मुलांच्या मनावर बिंबवलेले असते. मुलींच्या या अज्ञानाचा फायदा घेतला जातो. लग्न करू, नवीन विश्व बनवू अशा भूलथापा दिल्या जातात. त्यामुळे अगदी १३ ते १७ वष्रे वयोगटातील मुली प्रियकरासोबत घर सोडून जातात. मुलींचे हे प्रियकर शेजारीपाजारी, परिसरात राहणारे, समाजमाध्यमावर भेटलेले असतात. मुलींना घेऊन ते ओळखीच्या लोकांकडे, कधी कुठल्या लॉजवर किंवा अशाच कुठल्या तरी ठिकाणी घेऊन राहतात. पैसा संपतो, मुलीला वास्तवाची जाणीव होते, फसवले गेल्याचे समजते. मग ती घरी परतते. अल्पवयीन मुलीशी तिच्या संमतीनेही शरीरसंबंध ठेवले तरी बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल होतो. परंतु बदनामीपोटी पालक तक्रार देत नाहीत किंवा वैद्यकीय चाचणीस नकार देतात. यामुळे मुली घरी परत आल्या एवढीच नोंद होऊन ते प्रकरण थांबते. तिला फूस लावणारा मोकाटच राहतो. कोवळ्या वयात झालेले आघात त्या मुलीच्या मनावर कायमचे कोरले जातात. सगळ्याच मुली त्यातून सावरत नाहीत.

नालासोपारा पूर्वेचा भाग हा परप्रांतीय आणि कष्टकरी वर्गाच्या वसाहतींचा आहे. दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या चाळीत लोक राहतात. तुळिंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छोटय़ा घरात राहणारी मुले आई-वडिलांचा तसेच शेजारच्या शंृगार पाहत असतात. कोवळ्या वयात त्याचे तीव्र पडसाद उमटतात आणि त्याकडे ते आकर्षित होत असतात. पालक आणि मुलांमध्ये कमी होत असलेला संवाद हा आणखी एक मोठा घटक आहे. सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेले आई-वडील रात्री उशिरा घरी येतात किंवा आई घरात असली तरी मुले मोबाइलच्या विश्वात गुंतलेली असतात. आभासी जगात ते खोटय़ा विश्वाला खरे मानून बसतात. चांगल्या-वाईटांच्या परिणामांची कल्पना त्यांना येणं शक्य नसतं. उमलत्या वयातील मुलांना ते सांगावे याचे भानही पालकात नसते. ज्या मुली पळून जातात, त्यांचे प्रियकर हे परिसरातील रिक्षावाला, वयाने कित्येक मोठा असलेला टवाळ पोरगा, विवाहित पुरुष असतात. मुलींना प्रेमाच्या भूलथापा द्यायच्या, त्यांना फितवून पळवून न्यायचे. दोन-चार दिवस मजा करायची, अशी त्यांची पद्धत असते.

‘ऑपरेशन मुस्कान’ अयशस्वी

बेपत्ता झालेल्या ८० मुलांच्या शोधासाठी पालघर पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ सुरू केले, पण त्यातून जेमतेम पाच मुला-मुलींचा शोध लागला असावा. उर्वरित मुला-मुलींचे काय झाले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. ती कुठे असतील, कुठल्या संकटात असतील, त्यांच्या जिवाचे काही बरवाईट झाले नसेल ना, या प्रश्नांनी त्यांच्या पालकांची झोप उडवली आहे. केवळ ९० टक्के मुला-मुलींचा शोध लावला, असं सांगत पोलिसांनी आपली पाठ थोपविण्यात अर्थ नाही. तर सर्व मुलांचा तपास गांभीर्याने आणि प्राधान्याने करायला हवा. पूर्वी केवळ बेपत्ता अशी नोंद करून बोळवण केली जायची. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता असतील तर अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो, परंतु अपहरणाचा गुन्हा जरी दाखल होत असला तरी पोलिसांची मानसिकता मात्र बदलत नाही.

पालकांची जबाबदारी

बेपत्ता होण्याचे प्रकार रोखण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी पालकांची आहे. पालकांचे मुलांवर लक्ष असायलाच हवे. मुलींना घरात ठेवून त्या सुरक्षित असतील, असं पालकांना वाटतं. पण चार भिंतींआड मुलींना ठेवलं तरी तिच्या हातात स्मार्टफोन दिला जातो. वायफायच्या घरात असलेली मुलगी अधिक असुरक्षित असते, कारण समाजमाध्यमावर तिला भुलवणारे अनेक जण भेटतात. पालकांसमोर ती त्यांच्याशी चॅटवर नातं जुळवत असते. पालकांना त्याची कल्पना नसते. त्यामुळे मुली काय करतात, त्यांच्या मित्र-मैत्रिणी कोण यावर लक्ष असायला हवं. मुलं ही संवेदनशील असतात. त्यांच्यावर बंधने लादल्याने ती बंडखोर बनतात. त्यामुळे त्यांच्याशी सुसंवाद साधायला हवा अन्यथा हा धोका तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही.