ई-तिकीट काढणाऱ्यांपैकी १६ टक्के ठाणेकर

रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांसमोरील रांगा कमी करण्यासोबतच तिकीट यंत्रणा कागदविरहित करण्याच्या हेतूने रेल्वे प्रशासनाने २०१५ मध्ये सुरू केलेल्या अनारक्षित तिकीट यंत्रणा (यूटीएस) प्रणालीला प्रवाशांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळू लागला आहे. स्थानकात पोहोचण्याआधीच तिकीट काढण्याची सुविधा, रांगेतून सुटका आणि डिजिटल पेमेंटची सोय यामुळे प्रवासी ‘यूटीएस’ प्रणालीला पसंती देऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेवरील एकूण ई-तिकीट विक्रीमध्ये ठाणेकर प्रवाशांचा वाटा सर्वाधिक म्हणून १६ टक्क्यांहून अधिक आहे.

यूटीएस प्रणालीचा वापर करून ठाणे स्थानकात तिकिट काढणाऱ्यांची संख्या एप्रिल २०१७ मध्ये सरासरी ३ हजार ८५१ इतकी होती. जानेवारी २०१८ मध्ये ही संख्या सरासरी ९ हजार ८८९ इतकी झाली आहे. प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे मध्य रेल्वे मार्गावरील यूटीएस प्रणालीचा वापर करून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या एप्रिल २०१७ मध्ये ३५ हजार ७७२ इतकी होती, ती जानेवारी २०१८ मध्ये ५९ हजार ८५६ इतकी झाली आहे. थोडक्यात मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांदरम्यान काढण्यात आलेल्या एकूण पेपररहित तिकीट विक्रीत ठाणेकर प्रवाशांचे प्रमाण १६.५० टक्के इतके आहे.

कागदरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे तिकीट यंत्रणेत यूपीएस प्रणालीची सुरुवात करण्यात आली; परंतु मोबाइलद्वारे तिकीट काढण्याच्या या यंत्रणेला प्रवाशांकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रणालीत अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी प्रवाशांमार्फत केल्या जात होत्या. मात्र या यंत्रणेतील त्रुटी दुरुस्त केल्याचा दावा रेल्वे प्रशासनातर्फे केला जात आहे. प्रवाशांचा या प्रणालीला प्रतिसाद वाढावा यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे जुलै महिन्यापासून वेगवगळ्या उपक्रमांमार्फत प्रवाशांमध्ये या प्रणालीविषयी जागरूकता निर्माण केली जात होती. रेल्वे प्रशासनाच्या या उपक्रमांना यश आल्याचे जानेवारी महिन्याच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

अ‍ॅपचा वापर वाढवण्यासाठी क्लृप्त्या

यूटीएस प्रणाली प्रवाशांमध्ये अजून लोकप्रिय होण्यासाठी प्रशासनाद्वारे वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. या प्रणालीमध्ये तिकिटाचे शुल्क भरण्यासाठी आता सरकारच्या भीम अ‍ॅपचाही वापर करता येतो.  दहा दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनातर्फे भीम या अ‍ॅपद्वारे तिकीट यंत्रणेत शुल्क भरण्याच्या तंत्राची सुरुवात करण्यात आली. यूटीएस प्रणालीत ठिकाण निश्चित करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांमार्फत केल्या जात होत्या. येत्या काळात क्यूआर कोडचा वापर करून या अ‍ॅपमध्ये ठिकाण निश्चित करणे शक्य होणार आहे. क्यूआर कोड सध्या प्रायोगिक तत्त्वावर रेल्वे स्थानकांच्या तिकिटघरांबाहेर लावलेले असले तरी येत्या काही महिन्यांत हे तंत्रही रोजच्या वापरात येणार असल्याचे अधिकाऱ्यामार्फत सांगण्यात येत आहे.