ठाण्यात सर्वात चुरशीच्या लढतीमध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाई यांनी अपक्ष उमेदवार सुधाकर चव्हाण यांचा पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये झालेल्या या लढाईत शिवसेनेच्या परिषा सरनाईक यांच्या विजय झाल्याने शिवसेनेला प्रतिष्ठा राखण्यात यश आले आहे.
पवार नगर , वसंत विहार, शिवाईनगर, येऊर , कोकणीपाडा या भागाचा प्रभाग क्रमांक ५ मध्ये समावेश आहे. या विभागातून परिषा सरनाईक यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. परिषा सरनाईक या प्रताप सरनाईक यांच्या पत्नी आहेत. तर सुधाकर चव्हाण हे बिल्डर सुरज परमार आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. याशिवाय त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीदेखील आहे. गेली अनेक वर्षे अपक्ष आणि पाच वर्षांपूर्वी मनसेच्या निवडणूक चिन्हावर विजय मिळविणारे सुधाकर चव्हाण यंदा भाजपच्या वाटेवर होते. पण चव्हाण यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरमुळे भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्या प्रवेशावर आक्षेप घेतला. शेवटी भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही हे दिसताच सुधाकर चव्हाण अपक्ष म्हणून रिंगणार उतरले होते. ताई विरुद्ध भाईच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या चुरशीच्या लढतीमध्ये परिषा सरनाईक यांनी बाजी मारली आहे.




ठाण्यातील खासदार राजन विचारे यांची पत्नी नंदिनी विचारे यांचा विजय झाला आहे. तर विचारे यांच्या पुतण्याचा पराभव झाला. कुटुंबात तीन जणांना उमेदवारी मिळावी यासाठी हट्ट धरणारे माजी एच एस पाटील यांचादेखील पराभव झाला आहे. शिवसेना आमदार सुभाष भोईर यांचा मुलगा सुमित भोईर यांचाही पराभव झाला आहे. त्यामुळे घराणेशाहीला ठाणेकर मतदारांनी नाकारल्याचे चित्र दिसते.