tv05
मराठेशाहीच्या इतिहासात वसईच्या लढाईला मोठे महत्त्व आहे, कारण चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचा पराभव करून आधी ठाणे आणि नंतर वसई किल्ला जिंकला. बेलापूरातही चिमाजी अप्पांच्या पराक्रमाचे दाखले सापडतात. वसईच्या या मोहिमेत चिमाजीअप्पांना भिवंडीजवळील अंजूर गावातील गंगाजी नाईक यांनी मोलाची मदत केली. त्यांचे भाऊ बुधाजी नाईक यांच्या ठाण्यातील वाडय़ाचे हे छायचित्र. याच वाडय़ात पुढे इंग्रजी राजवटीत कलेक्टर कार्यालय सुरू झाले. पुढे जीर्ण झालेला वाडा तोडून त्याच ठिकाणी आताच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत उभारण्यात आली. या इमारतीलाही आता बरीच वर्षे उलटली.  ठाणे शहराचे पालकत्व असलेल्या महापालिकेतील इमारतीच्या उभारणीला नियोजनाचे वावडे असल्याचे स्पष् असताना जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत मात्र ऐसपैस आहे. याठिकाणी अधिकाऱ्यांची वाहने उभी करण्यासाठी जागाही बऱ्यापैकी आहे. मात्र, वेगवेगळी कामे घेऊन याठिकाणी येणाऱ्या अभ्यांगतांच्या वाहनांचा फारसा विचार करण्यात आलेला नाही. ठाणे जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आपली कामे घेऊन नागरिक येत असतात. याच ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत आहे. शहराबाहेर असला तरी अतिशय दाटीवाटीचा असा सगळा परिसर आहे. कळव्यातून ठाण्याकडे येताना या इमारतीच्या समोरुन जावे लागते. या ठिकाणी गर्दीच्या वेळत अभूतपूर्व अशी वाहतुकीची कोंडी होत असते.