ठाण्यातील कोरम मॉलमधील १ डिसेंबर २०१३ संध्याकाळ ‘द हिप हॉप मूव्हमेंट’च्या तरुणांसाठी काहीशी खास होती.. कारण त्यांचा इतक्या मोठय़ा स्वरूपाचा पहिलाच ‘लाइव्ह’ कार्यक्रम या ठिकाणी होणार होता. उत्सुकता, भीती आणि उत्कंठेने त्यांना भरून आले होते.. मात्र या तरुणांच्या सादरीकरणाला सुरुवात झाली आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढू लागला. एकाचवेळी ६० पेक्षा जास्त कलाकारांनी यावेळी आपली कला सादर केली आणि उपस्थितांची मने जिंकली. सुमारे दोन हजाराहून अधिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम याची देही याची डोळा अनुभवला..
१ डिसेंबर २०१३ रोजी ‘द हिप हॉप मूव्हमेंट’ या संस्थेने मोठय़ा स्तरावरचा पहिलाच कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम ठाण्यातील कोरम मॉल येथे आयोजित करण्यात आला होता. ६० पेक्षा जास्त कलाकारांनी या कार्यक्रमात आपली ‘हिप हॉप’ कला सादर केली. ठाण्यातील मॉलमध्येही हा अशा प्रकारचा आगळावेगळा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. म्हणून ‘द हिप हॉप मूव्हमेंट’च्या कार्यकर्त्यांमध्ये थोडीफार भीती होती. पण कार्यक्रम जसा सुरू झाला तस-तशी कोरम मॉलमध्ये गर्दी जमण्यास सुरुवात झाली. बघताबघता कोरम मॉलमध्ये पाय ठेवायलासुद्धा जागा उरली नाही. २०००पेक्षा जास्त प्रेक्षक उभे राहून या आगळ्यावेगळ्या संस्कृतीतून आलेल्या कलेचा आनंद घेत होते. मुळात पश्चिमेतून आलेल्या या संस्कृतीला ठाणेकरांनी प्रचंड टाळ्यांच्या माध्यमातून साथ दिली. ज्यामुळे कलाकार मोठय़ा ऊर्जेने आपले ‘हिप हॉप’ नृत्य, बीट-बॉक्सिंग आणि रॅपिंग सदर करू लागले. पण हे सगळे शक्य होत होते ते फक्त एका तरुणाने पाहिलेल्या स्वप्नामुळे.. तो तरुण म्हणजे विराट पवार. सगळ्यांनी विराटच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडल्यामुळे लोकांच्या शुभेच्छाही त्याला मिळाल्या. घरी जाऊन त्याने आपल्या आईला या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल सांगितले. ते ऐकल्यावर त्याच्या आईचे डोळे आनंदाने भरून आले. विराटने आईला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी आपण इतक्या दिवस सातत्याने केलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्याचा अनुभव विराटला आला.
मूळचा ठाणेकर असलेल्या विराट पवारला ‘हिप हॉप’ संगीताची प्रचंड आवड होती. कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर आपल्यासारखेच कोणीतरी ‘हिप हॉप’ संगीतप्रेमी आपल्या आजूबाजूच्या शहरात राहतात हे शोधण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला. ‘हिप हॉप’ या संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी विराट पश्चिम व दक्षिण मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘हिप हॉप’ कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊ लागला. पण घरी येता येता मध्यरात्र उलटून जायची. यामुळे विराटच्या बाबांनी अशा कार्यक्रमांना जाण्यास विरोध सुरू केला. जर आपण ‘हिप हॉप’कडे जाऊ शकत नाही तर मग ‘हिप हॉप’लाच आपल्या शहरात का घेऊन येऊ नये, असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. हा विचार मनाशी घट्ट करून विराट पवारने ठाणे ‘हिप हॉप मूव्हमेंट’ या नावाची संस्था २२ सप्टेंबर २०१३ रोजी सुरू केली.
ठाणे ‘हिप हॉप’ मूव्हमेंटने २२ सप्टेंबर २०१३ रोजी ‘द इंटरनल कल्चर व्हॅल्यूम १’ या नावाने हिरानंदानी मेडोस येथील आपला पहिला प्रयोग आयोजित केला. कार्यक्रमाचे स्वरूप अगदी छोटे होते. ९ कलाकारांनी या कार्यक्रमात त्यांची कला सदर केली होती. कार्यक्रमाला यश मिळाले आणि विराटच्या मनात एकप्रकारचे समाधान मिळाले. कारण ‘हिप हॉप’ या संस्कृतीला ठाण्यातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात विराटने पहिले पाऊल उचलले होते. बघताबघता ६०, मग ८०, मग १२० पेक्षा जास्त कलाकार ठाणे ‘हिप हॉप मूव्हमेंट’च्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागले. फक्त ठाण्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातील कलाकारांनी यात सहभाग नोंदवला. कोरम मॉल, विविआना मॉल अशा जागांवर सातत्याने कार्यक्रम होऊ लागले व हजारोंच्या संख्येने लोक कार्यक्रमाचा आनंद घेऊ लागले. दोन वर्षांतच ठाणे ‘हिप हॉप मूव्हमेंट’ ने द इटरनल कल्चर व्हॅल्यू २, ३ आणि ४ आणि त्यासोबत बीट ड्रॉप व्हॅल्यू १, २ आणि ३ या कार्यक्रमांचे आयोजन केले. विराटला एकटय़ाला हे करणे शक्य नव्हते. अशा वेळी अक्षय पाटील, सर्वेश गुरव आणि राहुल चव्हाण या मित्रांनी विराटला साथ दिली व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडू लागले. २०१५ मध्ये द प्रोजेक्ट युनिटी व्हॅल्यू १ या नावाने २ दिवसीय ‘हिप हॉप’ इव्हेंट हा टी.एच.एच.एम.ने आयोजित केला. हा भारतातील पहिलाच कार्यक्रम होता, ज्यात संपूर्ण भारतातून आलेल्या ‘हिप हॉप’र्सनी एका व्यासपीठावर आपली कला सदर केली. ठाणे ‘हिप हॉप’ मूव्हमेंटचे काम सध्या महाराष्ट्र, उत्तराखंड, कोलकता आणि दिल्ली अशा चार राज्यांत होत आहे. ८०पेक्षा जास्त सभासद आज टी.एच.एच.एम.सोबत काम करत आहेत. या कारणामुळे संस्थेचे नाव ठाणे ‘हिप हॉप मूव्हमेंट’ हे नाव बदलून ‘द हिप हॉप मूव्हमेंट’ असे करण्यात आले आहे.