श्रावण संपला की खवय्यांचा मोर्चा आपसूकच मांसाहाराकडे वळतो. नेहमीच्या घरगुती पदार्थापेक्षा वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीतले पर्याय निवडण्याकडे आजकाल अनेकांचा कल असतो. नवीन चव चाखायची म्हणून सुरुवात करत या पदार्थावर मनसोक्त तावही मारला जातो. अशावेळी असे पर्याय उपलब्ध करून देण्याचे आद्य कर्तव्य ‘दी स्ट्रीट प्लेट’ या कॉर्नरने पूर्ण केले आहे.

श्रावण आणि भाद्रपदातील गणशोत्सवापर्यंत अनेक जणांनी मांसाहार वज्र्य केलेला असतो. त्यामुळे आता ती आहारसंहिता राहिलेली नाही. गोड खाऊन कंटाळा आलेले खवय्ये तिखट बेत आखू लागले आहेत. आपल्याकडच्या स्थानिक, पारंपरिक पदार्थाबरोबरच मांसाहारामध्येही आता बरेच पाश्चात्त्य पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. कोल्हापूरचा प्रसिद्ध तांबडा-पांढरा रस्सा, खिमा पाव, पाया सूपबरोबरच पिझ्झा, पास्ता, मोमोज्ला पसंती मिळू लागली आहे. डोंबिवलीतील ‘९० फिट’ रस्त्यावर असलेल्या ‘दी स्ट्रीट प्लेट’ या छोटय़ा कॉर्नरवर मांसाहारी पदार्थाचे विविध प्रकार चाखायला मिळतात.

खवय्यांमध्ये सध्या बराच लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे शोर्मा. फ्रॅन्कीप्रमाणेच हा शोर्मा गोल गुंडाळी करून पॉकेट पीटा ब्रेड किंवा फूटलॉग या पावांमध्ये खाल्ला जातो. त्यात चिकनचा वापर केला जातो. चिकन पहाडी, चिकन टिक्का आदी प्रकारही इथे उपलब्ध असल्याचे दुकानाचे मालक मयूर माने यांनी सांगितले. विशेष म्हणजे मयूर स्वत: शेफ असल्याने नवनवीन पदार्थ खवय्यांना खिलविणे त्याला आवडते. रोटीमध्ये गुंडाळून दिलेल्या शोर्माचा खमंग सुगंध परिसरात दरवळत असतो. त्यामुळे हा शोर्मा खाण्यासाठी खवय्ये मोठय़ा संख्येने येतात. इतरत्र मोमोज्चे मांसाहारी प्रकार मिळतात. इथे मात्र शाकाहारी मोमोज् उपलब्ध आहेत. त्यातील ‘पनीर आचारी’ हा मोमोज्चा प्रकार खवय्यांच्या विशेष आवडीचा आहे. त्याला मस्त मुरलेल्या लोणच्याची चव असल्याने खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे कांदा, कोबी आणि पनीरसह लोणच्याची चव असणारा पनीर आचारी हा पदार्थ इथे अगदी सहज संपतो. मुळातच उकडलेले हे मोमोज् आपल्या महाराष्ट्रातील उकडीच्या मोदकाप्रमाणे लुसलुशीत असतात. मात्र यामध्ये तळलेले मोमोज् अधिक चविष्ट असल्याने खवय्ये त्यावर ताव मारतात. पायासूप आणि खिमा पाव येथे हमखास मिळतो. श्रावणाव्यतिरिक्त अनेक खवय्ये आठवडय़ातील काही वार पाळतात. त्यात कुणाचा सोमवार असतो तर कुणाचा गुरुवार. अशा वेळी त्यांनी येथील सोयाबीन चीज चिली मोमोज् खाऊन पाहायला हरकत नाही. त्यांना चिकन खाल्ल्याचे समाधान मिळेल.

इथला ‘खिमापाव’ही बेस्टच. चमचमीत लाल रंगाचा खिमा पाव खाण्याआधीच खवय्यांच्या जिभेला पाणी आणतो. संध्याकाळी सातनंतर येथील खाद्यमैफल सुरू होते. एका दिवसात साधारण  ५ ते ६ किलो चिकन सहज संपते. शनिवार-रविवार ८ ते १० किलो चिकन लागत असल्याचे मयूरने सांगितले. अर्धा किलोमध्ये ८-१० प्लेट मटण खिमा येथे सहज बनविला जातो. येथील पायासूपची चव बराचकाळ जिभेवर रेंगाळत राहते. सर्दी-पडसे झालेली मंडळी डॉक्टरी उपचारांसोबत सूप हे पारंपरिक पूरक औषध म्हणून घेतात. अर्थात असे काही न झालेल्यांनीही येथील सूप ट्राय करायला हरकत नाही. कारण त्याची चव खरेच भन्नाट आहे. याशिवाय ‘सलाट’ ही शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारची डिश इथे उपलब्ध आहे. टुना फिश या परदेशी माशापासून सलाड बनविले जाते. डबाबंद स्वरूपात हा मासा मिळतो. त्यात काकडी, टॉमेटो टाकून सलाडची डिश तयार होते. शाकाहारी ‘सलाट’साठी इथे आइसबर्ग या इटालियन भाजीचा वापर केला जातो. लाल रंगाच्या या भाजीतही काकडी, टोमॅटो आणि वेगवेगळ्या रंगाच्या भोपळी मिरचीचा वापर केला जातो. विशेष म्हणजे येथे पिझ्झा बेसही तयार केला जातो.

मऊ, लुसलुशीत आणि अगदी ताज्या बेसमुळे पिझ्झाच्या चवीत भर पडते. झेस्टी नावाचा एक सॉसचा प्रकार या सर्व पदार्थात वापरत असल्याचे मयूरने सांगितले. त्यामध्ये दही, दूध, मेयॉनिज, शेपू पार्सली अशा भाज्या वापरून हा सॉस तयार केला जातो. दिवसाला साधारण तीन किलो सॉस येथे सहज संपतो.

दी स्ट्रीट प्लेट

  • कुठे?:- म्हसोबा चौक, ९० फीट रस्ता, सवरेदय हिल इमारतीसमोर, ठाकुर्ली ( पू.)
  • वेळ – सायंकाळी ७ ते ११.