स्थानिक संस्था कर रद्द करण्यात आल्याने महापालिकेस यंदाच्या अर्थिक वर्षांत तब्बल दिडशे कोटींची तूट सोसावी लागणार असल्याने जमा खर्चाचे गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन मालमत्ता कर, पाणी कर, अग्निशमन दल, शहरविकास विभाग, स्थावर मालमत्ता आणि जाहिरात विभागाच्या वसुलीचे अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. जास्तीत जास्त कर संकलनासाठी राबवल्या जाणाऱ्या उपाय योजनांचा अहवाल एका आठवडय़ात सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. राज्यातील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यात आले असून त्यामुळे महापालिकेचा अर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी इतर कर वसुलीकडे पालिका आयुक्तांनी लक्ष वेधले आहे. त्या दृष्टीने मंगळवारी पालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी उपायुक्त, विभाग प्रमुख आणि सहाय्यक आयुक्त यांची बैठक घेतली. यावेळी विभागनिहाय वसुलीचा आढावा घेण्यात आला. यंदाच्या आर्थिक वर्षांत स्थानिक संस्था  कर रद्द झाल्याने १५० कोटींची तूट येणार असल्याचे त्यांनी विषद केले. तसेच मालमत्ता कर, पाणी कर, अग्निशमन दल कर, शहरविकास विभाग, स्थावर मालमत्ता आणि जाहिरात विभागातील वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे कसोसीने प्रयत्न करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. प्रत्येक विभाग प्रमुखाने वसुलीचा आढावा घेऊन वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करायच्या उपाय योजनांचा अहवाल पुढील आठवडय़ात सादर करण्याचे अदेश त्यांनी दिले. यावेळी महापालिका आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या प्रभागातील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करून तसेच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करतानाच त्यांना पर्यायी जागेसाठी पाहणी करुन त्याचाही अहवाल त्वरीत सादर करण्याचे आदेश दिले. धोकादायक इमारतींबाबतही संवेदनशीलपणे काम करा आणि जिवितहानी होणार नाही याची काळजी घ्या, असेही जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.